
गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने म्हाडामार्फत कल्याणमधील हेदुटणे आणि उत्तर शीव येथे जवळपास 13 हेक्टर जागेची चाचपणी सुरू केली आहे. राज्य शासनाच्या मालकीच्या या जमिनी ताब्यात घेऊन गिरणी कामगारांसाठी 300 चौरस फुटांच्या सुमारे 12 हजार घरांची निर्मिती करण्याची म्हाडाच्या मुंबई मंडळाची योजना आहे.
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. दीड लाख गिरणी कामगारांपैकी आतापर्यंत केवळ 15 हजार कामगारांनाच घरे मिळाली आहेत. अजूनही लाखो गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईत जागा मिळत नसल्याचे कारण देत राज्य सरकार आता महामुंबईत गिरणी कामगारांसाठी पर्यायी जागा शोधत आहे. कल्याणमधील हेदुटणे येथील 4.7 हेक्टर जागेवर 4500 तर उत्तर शीवमधील 7.5 हेक्टर जागेवर 7500 घरे बांधण्याचा म्हाडाचा प्लॅन आहे. यापैकी हेदुटणे येथील जमिनीची मोजणी म्हाडाने पूर्ण केली असून उत्तर शीव येथील जमिनीच्या मोजणीदरम्यान स्थानिकांनी विरोध दर्शवला. स्थानिकांच्या मागण्यांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्य सरकारने शेलू आणि वांगणीत तब्बल 81 हजार घरे बांधण्याची तयारी केली आहे; परंतु मुंबईतच हक्काच्या घराच्या मागणीवर ठाम असलेल्या गिरणी कामगारांनी या दोन्ही प्रकल्पांना जोरदार विरोध दर्शवला आहे. अशातच कल्याणधील या घरांना गिरणी कामगार कितपत पसंती देतील हा विषय आहे.
































































