आभाळमाया – अशनी-लघुग्रहांचा धांडोळा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक – [email protected]

सूर्यापासून आपली पृथ्वी सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे, असं आपण जाणतो आणि याच अंतराला एक खगोलीय युनिट किंवा ‘एकक’ म्हटलं जातं. तंतोतंत गणितात ते 14 कोटी 60 लाख किलोमीटर आहे. याच ‘एकका’चा वापर करून, सूर्यापासून सर्व ग्रहांची अंतरं किती असावीत याची एक पद्धत ‘टायटिअसबोड लॉ’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याला नुसतं ‘बोड लॉ’सुद्धा म्हटलं जातं, परंतु त्याची मांडणी जोहान टायटिअस आणि जौहान बोड यांनी केली आहे.

सौरमालेतील ग्रहांची परस्परातील अंतरं या अनुमानावर आधारित आहेत. त्याद्वारेच मंगळ आणि गुरू यांच्यामध्ये असलेला अशनींचा पट्टा आणि त्यातील ‘सेरेस’चं अंतर यथायोग्य ठरलं. हा थोडा ‘अनुमानात्मक’ किंवा इम्पिरिकल सिद्धांत आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे, त्यानुसार गुरूपलीकडच्या सर्वच ग्रहांची अंतरे या निरीक्षणात बसत नाहीत. मात्र मंगळ आणि गुरूमध्ये असलेला एखादा ग्रह सौरमालेच्या आरंभीच फुटून त्याचे तुकडे अशनी पट्टय़ाच्या स्वरूपात सूर्यापासून विशिष्ट अंतरावरून फिरतात हे खरं ठरलं.

काय आहे हा फॉर्म्युला? सोपं करून सांगायचं तर 0,3,6,12,24,48 अशा क्रमाने एकेका ग्रहाची ‘कक्षा’ ठरवली तर त्यामध्ये 4 मिळवून त्या संख्येला 10 ने भागलं तर जो ग्रह सूर्यापासून किती खगोलीय एकक (15 कोटीच्या तुलनेत आहे ते लक्षात येतं. यानुसार बुध सूर्यापासून 0.4 खगोलीय एकक, शुक्र 0.7 एकक, पृथ्वी 1 एकक, मंगळ 1.6 खगोलीय एकक (ए. यू.) अशनींचा पट्टा 2.8 एकक, गुरू 5.2 एकक आणि शनी 10 एकक (किंवा सूर्य-पृथ्वी अंतराच्या 10 पट अंतरावर) आहे हे सिद्ध झालं. मात्र त्यापुढच्या युरेनिअस आणि नेपच्युन या ग्रहांबाबतीत हे गणिती अनुमान यशस्वी ठरलं नाही.

या सिद्धांत म्हणण्यापेक्षा सूत्रानुसार मंगळ आणि गुरूच्या मध्यभागी असलेला अशनी पट्टा निश्चित झाला हे महत्त्वाचं. असे अनेक छोटे-मोठे अशनी अवकाशात इतस्ततः फिरत असतात. ‘निअर अर्थ’ म्हणजे पृथ्वीनिकट असणाऱ्या आणि कदाचित कधीकाळी पृथ्वीवर आदळू शकणाऱ्या अशनींची संख्याही मोठी आहे.

यापेक्षा आणखी कुतूहलाची गोष्ट म्हणजे लघुग्रह हे अशनींपेक्षा थोडे मोठे असतात. त्यांचं स्वरूप जवळून जाणून घेण्यासाठीही काही शोधमोहिमा कार्यान्वित झाल्या. यातील पहिल्या मोहिमेत ‘इरॉस’ या अशनीभोवती फेरी मारून त्यावर उतरले ते निअर शूमेकर. त्यानंतर जपानने हायाबुसा-1 आणि 2 अशी यानं इटोकावा आणि रुग्यु लघुग्रहांकडे धाडली.

ओसिरिस शोधयानाने बेन्नू नावाच्या महापाषाणावरून काही दगड-मातीचे नमुने गोळा केले आणि पुढे ते ‘अॅपोफिस’कडे रवाना झाले. मंगळ-गुरू यांच्या मधल्या पट्टय़ातील व्हेस्टा आणि सेरेस या लघुग्रहांना ‘डॉन’ यानाने फेरी मारली आणि त्यांचे बारकाईने निरीक्षण केले. ल्युसी नावाचे शोधयान अनेक ट्रोजन म्हणजे विशिष्ट बिंदूंवर अडकलेल्या लघुग्रहांचा शोध घेत फिरले. सायचे नावाचे यान केवळ धातुजन्य अशनी आणि लघुग्रहांचा शोध घेण्याच्या कामगिरीवर निघाले.

2022 मध्ये नासाच्या ‘डार्ट’ या नावाने डिमॉर्फोस या डायडिमॉस या लघुग्रहाभोवती फिरणाऱ्या लहान लघुग्रहाला मुद्दाम धडक देऊन (ताशी 22000 कि.मी. वेगाने) त्याची कक्षा यशस्वीरीत्या बदलली. हा प्रयोग एवढय़ासाठी केला गेला की, भविष्यात एखादा लघुग्रह, अशनी पिंवा धूमकेतू यांचा धोका पृथ्वीला निर्माण होणार असेल तर त्याची कक्षा एखादी ‘धडक’ देऊन बदलता येऊ शकेल. 2005 मध्ये ‘डीप’ यानाने अशाच प्रकारे टेम्पल – 1 या धूमकेतूला धडक दिली होती.

लघुग्रह किंवा अशनींचा शोध आणि निरीक्षण केवळ ते पृथ्वीला धोकादायक ठरतील का, एवढय़ाच मर्यादित उद्दिष्टाने केले जात नाही. कित्येक अशनी पृथ्वीच्या दिशेने कधीच येणार नाहीत याची खात्री असूनही त्यांचे जवळून निरीक्षण, इतर अनेक कारणांसाठी महत्त्वाचे ठरते.

यामध्ये जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने ‘इटोकावा’ या लघुग्रहांवर हायाबुसा – 2 ही मोहीम आखली. डॉ. हिडेओ इटाकावा यांचे नाव या लघुग्रहाला देण्यात आले. जपानी भाषेत हायाबुसा म्हणजे वेगाने उडणारा ससाणा. तो ताशी 300 कि.मी. वेगाने उडतो. त्याच्या नावाच्या वेगवान यानाचे उड्डाण 9 मे 2023 रोजी झाले होते. त्याने तब्बल सात वर्षे अंतराळात प्रवास करून 25143 इटोकावा या लघुग्रहावर उतरून आणि तेथील दगड-मातीचे नमुने पृथ्वीवर आणून अंतराळी वस्तूंच्या संशोधनाचे नवे दालन खुले केले.

अशा प्रकारच्या शोध-मोहिमांमधून अंतराळाचा अधिक चांगला परिचय आपल्याला होऊ शकतो. समजा या अशनींवर काही वेगळीच संयुगं, धातू पिंवा इतर काही घटक सापडले आणि तसे पृथ्वीवर नसले तर विश्वात इतरत्र कुठे, कसल्या ‘भूमी’चे अवशेष आहेत ते नक्कीच समजेल. यासाठी असे अनेक प्रयोग गरजेचे असतात. दरवेळी चंद्र किंवा मंगळच नव्हे तर एखादा छोटासा अशनीसुद्धा महत्त्वाचा ठरतो. हायाबुसा-2 चे यश आणि त्यानंतर काय? ते नंतरच्या लेखात पाहू.