क्रीडा मंत्रालयाचा टेबल टेनिस महासंघाला दणका, थेट मान्यताच रद्द केली; कारण काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या क्रीड मंत्रायलाने हिंदुस्थानच्या टेबल टेनिस महासंघाची (TTFI) मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. टेबल टेनिस महासंघाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. तसेच प्रशासनिक त्रुटी, खेळाडूंबाबत अपारदर्शकता आणि वेळेवर निवडणुका न घेणे या सर्व कारणांचा विचार करता क्रीडा मंत्रालयाने कठोर पाऊल उचलत टेबल टेनिस महासंघाची मान्यताच रद्द करून टाकली आहे.

PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, महासंघात योग्य प्रशासन व्यवस्था पूर्ववत होईपर्यंत देशातील टेबल टेनिसच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघाने (IOA) एक एड-हॉक समिती स्थापन करावी, असे निर्देश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत. तसेच हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघाला आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाशी (ITTF) चर्चा करून एक अंतर्गत नियमन प्रणाली तयार करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मान्यता किती काळासाठी रद्द करण्यात आली आहे आणि ती केव्हा पुनर्संचयित केली जाईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान, हिंदुस्थानी टेबल टेनिस संघटनेच्या कार्यपद्धती आणि व्यवस्थापन मागील काही वर्षांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हिंदुस्तानची टेबल टेनिसमधील अव्वल दर्जाची खेळाडू मनिका बत्राने 2021 साली राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यावर सामना हरण्याकरता दबाव टाकल्याचा आरोप केला होता. सौम्यदीप रॉय यांनी आपल्या प्रशिक्षणार्थीने सामना जिंकावा म्हणून मनिका बत्रावर दबाव टाकलल्याच आरोपात म्हटल होतं. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने 2022 मध्ये संघटनेच्या कार्यकारी समितीला निलंबित केलं आणि तिची कार्यपद्धती “अत्यंत खराब” असल्याचे म्हटलं होतं.