
छत्तीसगडमधून एक अत्यंत संतापजनक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. सरगुजा जिल्ह्यात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला शासकीय कागदपत्रांमध्ये जिवंत दाखवण्यात आले. मृत्यूच्या 42 दिवसांनंतर संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत ते पूर्णपणे बरा होऊन घरी परतत असल्याचा मेसेज आला. या घटनेमुळे शासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल देवनारायण राम असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. देवनारायण यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना 26 जून रोजी अंबिकापूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान 30 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने त्यांचे मृत्यू प्रमाणपत्रही जारी केले होते. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी सर्व विधी पूर्ण करून अंत्यसंस्कारही केले होते.
मात्र, या सर्व घडामोडींनंतरही सरकारी ‘आयुष्मान भारत’ योजनेच्या पोर्टलवर त्यांच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. मृत कॉन्स्टेबलच्या पत्नी सीमा कुजूर या जशपूर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 10 ऑगस्ट रोजी पतीच्या फोनवर एक ऑटो-जनरेटेड मेसेज मिळाला. या मेसेजमध्ये लिहिले होते, “प्रिय देवनारायण राम, आम्हाला आनंद आहे की तुम्ही बरे होऊन घरी परतत आहात…” हा मेसेज वाचून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पतीचा मृत्यू होऊन 42 दिवस झाल्यानंतर असा मेसेज आल्यामुळे पत्नी सीमा कुजूर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून या प्रकाराबद्दल तीव्र शब्दांत नाराजी नोंदवली. “जर माझ्यासारख्या शासकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबासोबत असे घडत असेल तर, सामान्य व्यक्तींची काय गत होत असेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकारानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. अंबिकापूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या प्रशासनाने हा प्रकार गंभीर मानत स्पष्ट केले की, डेटा एंट्री ऑपरेटरच्या दिरंगाईमुळे पोर्टलवर क्लेम उशिरा बंद करण्यात आला. ज्यामुळे हा ऑटो-जनरेटेड मेसेज पाठवला गेला. तसेच मृत्यूनंतर कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त उपचाराचा खर्च घेतला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. संबंधित डेटा एंट्री ऑपरेटरला बडतर्फ करण्यात आले आहे.




























































