‘हाताने उखडतोय’ 6.81 कोटींचा रस्ता! पहिल्याच पावसात बोथबोडन–जामवाडी मार्गाची चाळण, निकृष्ट कामाचा ग्रामस्थांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्णी रोडवरील नॅशनल हायवे-३६१ पासून बोथबोडन–ईचोरी–जामवाडी या ११.३५ किलोमीटर रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ६ कोटी ८१ लाख ३६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, निकृष्ट साहित्याचा वापर आणि कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष झाल्याने रस्ता उखडून ठिकठिकाणी खड्डे पडल्याचा आरोप बोथबोडन ग्रामस्थांनी केला आहे.

पहिल्याच पावसात रस्त्याची पोलखोल

या मार्गाच्या कामासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला असतानाही पावसाळा सुरू होताच रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असून खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था पाहता कोट्यवधींचा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा सवाल उपस्थित होत आहे.

‘हातानेही खणता येतो डांबरी रस्ता!’

रस्त्याच्या निकृष्ट कामाचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अनुप चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. “रस्त्याची परिस्थिती इतकी खराब आहे की हा डांबरी रस्ता साध्या हाताने खणला तरी चालतो,” असा दावा त्यांनी केला.

देखभालीसाठीही ५३ लाख; तरी रस्ता उखडला

या रस्त्याच्या पाच वर्षांच्या देखभालीसाठी ५३.०९ लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, देखभालीची तरतूद असतानाही रस्ता पहिल्याच पावसात खराब झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. रस्त्याच्या कामाची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.