
टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी महिन्यात संपत असल्याने तोपर्यंत ते या पदावर कायम राहणार आहेत. टाटा समूहातील अंतर्गत घडामोडींची माहिती असलेल्या एका सूत्राने रॉयटर्स वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. सध्या टाटा समूह आपल्या विविध व्यवसायांमध्ये अनेक आव्हानांचा सामना करत असतानाच चंद्रशेखरन यांनी राजीनामा दिल्याचे माहिती आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवरून टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टमध्ये वाद निर्माण झाला होता. टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांना मुदतवाढ देण्यास विरोध केला होता. टाटा सन्स कधीही शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्ट) केली जाणार नाही, अशी हमी नोएल टाटा यांना हवी होती. पण चंद्रशेखरन यांनी अशी हमी देण्यास नकार दिला होता. तसेच संचालक मंडळातील प्रतिनिधित्वावरूनही दोन्ही बाजूंमध्ये मतभेद झाले होते.
टाटा सन्स ही चारशे अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्य असलेल्या टाटा समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी आहे. ही कंपनी टीसीएस (TCS), टाटा मोटर्स आणि एअर इंडियासह 30 हून अधिक कंपन्यांवर नियंत्रण ठेवते. विशेष म्हणजे टाटा सन्सच्या मालकीपैकी 66 टक्के हिस्सा हा ‘टाटा ट्रस्ट’कडे आहे. एन. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीत घडलेल्या या मोठ्या घडामोडीमुळे समूहाच्या कारभारात खळबळ उडाली आहे.
नेतृत्वातील बदलाच्या वृत्तामुळे बुधवारी टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. रॉयटर्सच्या वृत्तानंतर टाटा समूहाचे शेअर चार टक्क्यांपर्यंत घसरले. यामुळे समूहाच्या सर्वच सूचीबद्ध कंपन्यांमध्ये शेअर्सची विक्री वाढली. यामध्ये देशातील सर्वात मोठी IT कंपनी असणारी टीसीएसचे (TCS) शेअर 4.1 टक्क्यांनी घसरले तर, जग्वार लँड रोव्हरची मालकी असलेल्या टाटा मोटर्सचे शेअर 2.8 टक्क्यांनी खाली आले.


























































