गृहविभागाचा धाक संपल्यानेच गुन्हेगारांचं मनोबल वाढलं, पुरंदर आणि पालघर प्रकरणावरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुरंदरमधील 10 वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि पालघरमधील अपघातग्रस्त तरुणीच्या असहायतेचा सहा नराधमांनी घेतलेला गैरफायदा या घटनांवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गृहविभागावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवाय गृहविभागाचा धाक संपल्यानेच गुन्हेगारांचं मनोबल वाढलं असून अशा संतापजनक घटना रोज घडत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या एक्स अकाऊंटवरून सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी लिहिले की, पुरंदरमध्ये 10 वर्षांच्या चिमुरडीवर झालेला बलात्कार आणि पालघरमध्ये अपघातग्रस्त तरुणीच्या असहायतेचा 6 नराधमांनी घेतलेला गैरफायदा… या अत्यंत संतापजनक घटना महाराष्ट्राच्या ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा जिवंत पुरावा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. गृहविभागाचा धाक पूर्णपणे संपल्यामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून, अशा दुर्दैवी घटना रोज घडत असल्याची टीका त्यांनी केली. महिलांची सुरक्षा हा राज्यातील सर्वोच्च मुद्दा असायला हवा, याच भूमिकेतून आम्ही सातत्याने ‘शक्ती कायद्या’चा आग्रह धरत आहोत, पण सरकार मात्र यावर मूग गिळून गप्प बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सरकारच गुन्हेगारांना मोकळे रान सोडत आहे का, असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.