
मागील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या असतानाही चुकीच्या सॅटेलाइट सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. आजही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत, असा आरोप करत शेतकरी संघटनेच्या वतीने बार्शी–धाराशिव रस्त्यावरील चिखर्डे येथील बसस्थानकावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. खरीप २०२५ चा पीक विमा एसडीआरएफ (SDRF) व एनडीआरएफच्या (NDRF) निकषांनुसार तातडीने मंजूर करावा, चुकीच्या सॅटेलाइट सर्वेक्षणाचा फेरविचार करून तो रद्द करावा, पीक विम्यातून वगळण्यात आलेले चार ट्रिगर पुन्हा लागू करावेत तसेच आजपर्यंत शेतकऱ्यांना देय असलेली पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करावी, अशा प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या. तसेच पीक विमा कंपन्यांच्या कामकाजाबाबतही शेतकरी संघटनेने आक्षेप नोंदवला. पीक विम्याचे राज्यप्रमुख विनयकुमार आवटे यांच्यासह संबंधित सर्व पीक विमा कंपन्यांच्या स्थापनेपासूनच्या संपत्तीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
शंकर गायकवाड म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही प्रत्यक्ष नुकसानीचा विचार न करता सॅटेलाइट सर्वेक्षणाच्या आधारे पीकविम्याचे निर्णय घेतले जात असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. या वेळी शरद भालेकर, रामभाऊ काटे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पांगरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.






























































