
> > प्रशांत गौतम
प्रतिवर्षी येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अप्रूप व उत्सुकता महाराष्ट्रासह बहुभाषिकांनाही असते. त्यात संमेलनाचे शताब्दी वर्ष म्हटल्यावर या वाटणाऱ्या अप्रुपात आणखी भर पडणार. सातारा येथील 99व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ.मिलिंद जोशी यांनी शंभरावे साहित्य संमेलन हे पुण्यात होणार याची घोषणाच करून टाकली. दरम्यान, साहित्य परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्या, गाजल्या आणि वाजल्या. निवडणुकीच्या या रणसंग्रामात महामंडळाचे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष हे प्रमुख पदाधिकारी पराभूत झाले, रंगकर्मी योगेश सोमण यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवत प्रतिस्पर्धी जोशी गटावर मात केली. यथावकाश सोमण साहित्य परिषदेचे व महामंडळाचे अध्यक्ष झाले. हारतुरे, सत्कारात न रमता नवीन कार्यकारिणी लगोलग कामाला लागली. ‘साहित्य पत्रिका’ या मसापच्या मुखपत्रास संपादक मिळाले. आता नव्या कार्यकारिणीसमोर सर्वात पहिले आव्हान आहे ते शताब्दी संमेलन आयोजनाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे.
संमेलनाचे स्थळ आधीच निश्चित झाल्याने स्थळ पाहणी हा सोपस्कार होता. तोही पार पडला. पुण्यातील शताब्दी संमेलनास सह आयोजक म्हणून अनेक जुन्या संस्थांची नावे चर्चेत होती, पण त्यातल्या त्यात संमेलनाचे स्थळ म्हणून पुणे विद्यापीठाची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. ‘पुणे तिथे काय उणे!’ या बहुचर्चित वाक्याची प्रचीती आता संमेलनाच्या नांदीपासून ते सूप वाजण्यापर्यंत साहित्य रसिकांना येतच राहणार आहे. एकदिवसीय साधा कार्यक्रम असला तरी पुणेकर आयोजनात व्यवस्थित नियोजन करतात, गृहपाठ करतात आणि उत्तम तयारी करतात. आता शंभरावे संमेलन म्हटल्यावर कच्चा गृहपाठ असायलाच नको. याचाच तयारीचा भाग म्हणून शताब्दी संमेलन आयोजनाच्या तयारीसाठी मसाप पदाधिकारी,व इच्छुक कार्यकर्ते यांची कार्यशाळा जुलै महिन्याच्या 26 तारखेला संपन्न झाली. यासाठी राज्यभरातील 200 निमंत्रित साहित्यिक/कार्यकर्ते हजर होते. नमनालाच भरघोस प्रतिसाद मिळत असणे म्हणजे संमेलन यशस्वी होण्यासाठी ही सकारात्मक सुरुवात समजली पाहिजे.
या कार्यशाळेतील महत्त्वाची बातमी म्हणजे शताब्दी संमेलनानिमित्ताने 99 संमेलने देशभरात निवडक ठिकाणी होणार आहेत. यात आधी जिथे संमेलन झाले तिथल्या गावांचाही समावेश असणार आहे.
यासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी सांगितले, नांदी संमेलनातील पहिले संमेलन पुण्यातील हिरा बागेत 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला होणार आहे. यात 100 वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ हास्यचित्रकार शि.द.फडणीस व ज्येष्ठ व्याकरण तज्ञ यास्मिन शेख यांच्यासह जुन्या संस्थांचा सत्कार होणार आहे तर 99वे संमेलन 15 जानेवारी 2027 रोजी औदुंबर येथे होणार आहे. मधल्या काळात नांदी संमेलनाच्या स्थळांसंदर्भात मसापकडे नियोजन असेलच. म्हणजे आगामी तीन/चार महिन्यांत संमेलनाची वारी आपल्या दारी येणार आहे.महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स्थानिक साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही 99 नांदी संमेलने होणार आहेत. साहित्य क्षेत्रासाठी असो की लेखकांसाठी असो, ही घटनाच मुळात लक्षवेधी आहे.
संमेलनाचे स्थळ ठरले की, अध्यक्ष कोण? ही चर्चाही होणारच.जेव्हा निवडणूक होती तेव्हाचे वातावरण साहित्य क्षेत्राने एक काळ अनुभवले. यवतमाळच्या साहित्य संमेलनापासून अध्यक्ष निवडणुकीतून निवडण्याऐवजी महामंडळाचे 19 पदाधिकारी सर्वसंमतीने ठरवू लागले आहेत. शंभराव्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण? हे ठरवायला दोन महिने बाकी आहेत. गोव्यात होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीतच ते ठरेल. एक मात्र खरे. अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेली प्रमुख नावे म्हणजे प्रख्यात विचारवंत डॉ.शेषराव मोरे, लोकप्रिय अनुवादक, लेखिका उमाताई कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील, ललित लेखक प्रवीण दवणे. याशिवाय आगामी काही दिवसांत यात नवीन नावांची भर पडलेली दिसेल. त्यामुळे तमाम साहित्य रसिकांना आता या नांदी संमेलनासह शताब्दी संमेलनाविषयीही अप्रूप असेल, उत्सुकता असेल, यात शंकाच नाही.





























































