
पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआर हक्कांवरून ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला. ‘न्यायालयाने निकाल देऊनही हक्काचा टीडीआर आम्हाला दिला जात नाही. मंत्रालयातून विनाकारण त्रास दिला जात आहे, असा आरोप करतानाच, महाराष्ट्रात राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय,’ असा उद्वेग त्यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला.
धनकवडी येथे उषा चव्हाण यांच्या कुटुंबाची जमीन आहे. त्या जमिनीच्या टीडीआरचा वाद 26 वर्षे न्यायालयात होता. या प्रकरणात मार्च 2026 मध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाने उषा चव्हाण यांचा मुलगा हृदयनाथ यांचा मालमत्तेत कायदेशीर हिस्सा असल्याचे मान्य केले. त्यानंतरही पुणे महापालिकेच्या अधिकाऱयांनी चव्हाण यांच्या हक्काचा टीडीआर एका खासगी बिल्डरला चुकीच्या पद्धतीने मंजूर केल्याचा त्यांचा आरोप आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र काहीही झालेले नाही, असा त्रागा त्यांनी व्यक्त केला.
मराठी माणसाच्या कष्टाचं परप्रांतीयांना का देताय?
‘दोन्ही पक्षांनी एकत्र बसून वाद सोडवावा असे न्यायालयाने सांगितले होते. यात महापालिकेचा संबंध नव्हता. मात्र पुणे महापालिकेने परस्पर माझ्या हिश्शाचा टीडीआर एका परप्रांतीयाला देऊन टाकला. त्यांना हा अधिकार कुणी दिला? हा काय दुष्टपणा चालवलाय, ही मोघलाई आहे का, याच्या मागे कोण आहे,’ असा सवाल उषा चव्हाण यांनी केला. ‘मराठी माणसाच्या कष्टाचे परप्रांतीयांना दिले जात आहे. सगळे काही परप्रांतीयांना देऊन मराठी माणसाला झोपवायचे ठरवले आहे का? मी ते होऊ देणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला. ‘मी माझ्या हक्काच्या गोष्टीसाठी भांडते आहे. बेकायदेशीर काही असते तर मी पुढे गेलेच नसते,’ असेही त्या म्हणाल्या.



























































