
लहान मुलेही मोबाईलच्या आहारी गेली आहेत. लहान मुलांकडून होणारा मोबाईलचा अतिवापर टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने आज स्थायी समितीच्या बैठकीत एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये ऑनलाईन अभ्यास देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या पध्दतीप्रमाणे अभ्यास देऊन मोबाईलच्या अतिवापरावर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनापासून ऑनलाईन अभ्यास सुरू करण्यात आला. शाळेमध्ये मुलाना ऑनलाईन अभ्यासक्रम दिला जातो. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल येऊन त्याचा वापर वाढू लागला. मोबाईलचा अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. काही शाळांमध्ये गुगलवर माहिती शोधून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सांगितले जाते. पाठ्यपुस्तक न उघडता विद्यार्थी गुगलवरच उत्तरे शोधताना आढळून येतात.
यासर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत रत्नागिरी जिल्हापरिषदेने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या मोबाईलच्या अतिवापराबाबत सदस्यांनी चिंता व्यक्त केली. नव्या निर्णयामुळे शिक्षकांना पुन्हा जुनी अभ्यासाची पधदत अमंलात आणावी लागणार आहे.
चौकट- बे ते ३० पर्यंत पाढे पाठांतर
ऑनलाईन अभ्यास बंद करून पुन्हा जुन्या पध्दतीवर भर देण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हापरिषदेने घेतला आहे. शाळांमध्ये बे ते ३० पर्यंतचे पाढे पाठांतर करण्यावर भर दिला जाणार आहे. पूर्वीच्या काळात विद्यार्थी पाढे तोंडपाठ करत होते. मोबाईलच्या वापरामुळे पाढे पाठांतर पध्दत मागे पडली होती. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेने पाढे पाठांतरावर भर दिला आहे. शिक्षण अधिकारी आणि पदाधिकारी शाळांना भेटी देऊन पाढे पाठांतर आहे की नाहीं याबाबत पहाणी करणार आहेत.




























































