
नवी दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्स्प्रेसमधील एका व्हायरल व्हिडिओवरून सध्या भारतीय रेल्वे वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती ट्रेनच्या डब्यात वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यातील काही जण रेल्वेच्या तिकीट तपासनीसांच्या गणवेशात आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्तव्यावर असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे खासगी समारंभ साजरे करणे नियमानुसार किती योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती केक कापत असून उपस्थितांनी त्याला फुलांचा हार घालून शुभेच्छा दिल्या आहेत. डब्याची अंतर्गत रचना पाहता हा व्हिडिओ शताब्दी एक्स्प्रेसचा असल्याचे बोलले जात आहे, तर यामध्ये दिसणारे तिकीट तपासनीस झाशीचे असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओशी संबंधित दाव्यांची अद्याप स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाकडून सखोल चौकशी केली जात असून, चौकशीनंतरच व्हिडिओ कधीचा आहे आणि संबंधित व्यक्ती खरोखरच कर्तव्यावर होत्या की नाही, हे स्पष्ट होईल.
हनीमून के बाद अब ट्रेन में धूमधाम से बर्थडे सेलिब्रेशन, शताब्दी में केक काटते दिखा स्टाफ pic.twitter.com/NVkQ9LrUat
— Santosh Misra ‘mohit’ (@Santosh_misraa) August 11, 2026
काही दिवसांपूर्वीच 6 जुलै 2026 रोजी नंदीग्राम एक्स्प्रेसचा एक एसी डबा फुलांनी सजवून हनिमून सूटसारखा सजवल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी रेल्वेने कठोर कारवाई करत संबंधित तिकीट तपासनीसास निलंबित केले होते. आता शताब्दी एक्स्प्रेसमधील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झाशीचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून चौकशीच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत आणि कार्यपद्धतीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.



























































