
हिमाचल प्रदेशात पावसामुळे मोठे संकट निर्माण झाले असून, मुसळधार पाऊस, भूस्खलन, पूर, ढगफुटी आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्राच्या ताज्या अहवालानुसार, 30 जूनपासून आतापर्यंत नैसर्गिक आपत्ती आणि रस्ते अपघातांमध्ये तब्बल 157 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 68 जणांचा मृत्यू नैसर्गिक आपत्तींमध्ये , तर 89 जणांचा मृत्यू रस्ते अपघातांमध्ये झाला आहे. या दुर्घटनांमध्ये 257 जण जखमी झाले असून, दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार, नैसर्गिक आपत्ती आणि रस्ते अपघातांतील एकत्रित मृत्यूंची जिल्हानिहाय संख्या पाहता चंबा जिल्ह्यात सर्वाधिक 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कांग्रा आणि कुल्लू येथे प्रत्येकी 21 , शिमला येथे 20 , लाहौल-स्पितीमध्ये 18 , सिरमौरमध्ये 16 , मंडीमध्ये 7, किन्नौरमध्ये 5, बिलासपूरमध्ये 4, हमीरपूरमध्ये 3, तर सोलन आणि उना जिल्ह्यात प्रत्येकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. असे वृत्त न्यूज 18 ने दिले आहे.
पावसामुळे राज्यातील घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 22 पक्की आणि 94 कच्ची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय 42 पक्की आणि 161 अन्य घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. यासोबतच 13 दुकाने, तीन मजुरांच्या झोपड्या आणि 217 जनावरांचे गोठे बाधित झाले आहेत. विविध घटनांमध्ये 201 जनावरे आणि पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
हिमाचल प्रदेशातील सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारी अहवालानुसार, आतापर्यंत 886 कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घरांसह दुकाने, कारखाने, कामगारांच्या झोपड्या, गोशाळा आणि इतर खासगी मालमत्तेला फटका बसला आहे. याशिवाय पिके आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
सरकारी पायाभूत सुविधांनाही या आपत्तींचा मोठा फटका बसला आहे. सार्वजनिक बांधकाम, जलशक्ती, वीज, आरोग्य, शिक्षण, मत्स्यव्यवसाय, ग्रामीण विकास, शहरी विकास आणि पशुसंवर्धन विभागाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मान्सूनच्या काळात केवळ नैसर्गिक आपत्तीच नव्हे, तर रस्ते अपघातही मृत्यूचे प्रमुख कारण ठरले आहेत. आतापर्यंत 89 जणांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये चंबा जिल्ह्यात सर्वाधिक 15 मृत्यू झाले असून, कुल्लूमध्ये 13, शिमल्यात 12, मंडीत 11, कांग्रामध्ये 10 आणि सिरमौरमध्ये आठ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात यंदाच्या मान्सूनमध्ये भूस्खलन, अचानक आलेले पूर, ढगफुटी, वीज कोसळणे, झाडे आणि दगड कोसळणे तसेच बुडण्याच्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. अनेक भागांमध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे नैसर्गिक आपत्तींचा कहर सुरू असताना दुसरीकडे रस्ते अपघातांमुळे मृतांचा आकडा वाढत असल्याने हिमाचल प्रदेशातील मान्सूनचे संकट अधिक गंभीर बनले आहे.





























































