
जागतिक बाजारात सुरू असलेल्या उलथापालथ आणि इराण-अमेरिका संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती याचा थेट परिणाम सराफा बाजारावर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदी या मौल्यवान धातुंच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. मंगळवारीही सोन्याचा भाव चांगलाच वधारला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) च्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1849 रुपयांनी वाढून 1 लाख 52 हजारांवर पोहोचले.
एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडत असताना दुसरीकडे चांदीची चमकही वाढत चालली आहे. मंगळवारी चांदीचे दर प्रति एक किलोमागे 2 हजार 907 रुपयांनी वधारले. त्यामुळे चांदीचा भाव 2 लाख 34 हजारांवर पोहोचला. विशेष म्हणजे गेल्या दहा दिवसांमध्ये सोने आणि चांदीचे दर चांगलेच वाढले आहेत. सोने 9 हजार 630 रुपये, तर चांदी तब्बल 15 हजार 985 रुपयांनी महागली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सोने, चांदी खरेदी करताना ग्राहकांना खिसा मोकळा करावा लागत आहे.
सोन्याचा आजचा दर
24 कॅरेट – 1 लाख 52 हजार 490 रुपये
22 कॅरेट – 1 लाख 39 हजार 681 रुपये
18 कॅरेट – 1 लाख 14 हजार 368 रुपये
14 कॅरेट – 89 हजार 207 रुपये
देशातील प्रमुख शहरातील दर (24 कॅरेट, 10 ग्रॅम)
दिल्ली – 1 लाख 55 हजार 280 रुपये
दिल्ली – 1 लाख 55 हजार 460 रुपये
कोलकाता – 1 लाख 55 हजार 460 रुपये
लखनऊ – 1 लाख 55 हजार 280 रुपये
जयपूर – 1 लाख 55 हजार 280 रुपये
सोने-चांदीच्या दरात चढ-उतार
यंदाच्या वर्षी सोने-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. गेल्या आठ महिन्यांमध्ये सोने 19 हजारांनी महागले आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 33 हजार रुपये होता. तर दुसरीकडे चांदीतही 4 हजारांची वाढ नोंदवण्यात आलीआहे. 31 डिसेंबर 2025 रोजी चांदी प्रति किलो 2 लाख 30 हजार रुपये होती. विशेष म्हणजे याच वर्षी जानेवारी महिन्यात सोने तब्बल 1 लाख 76 हजार आणि चांदी 3 लाख 86 हजार या विक्रमी किंमतीवर पोहोचले होते.


























































