दिल्लीत बनावट नोटांच्या साहाय्याने फसवणूक, तीन भामट्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली पोलिसांनी ५०० रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींनी या व्यक्तीला बनावट नोटांचे खास तयार केलेले बंडल देऊन ही फसवणूक केली होती. जावेद, सोहेल आणि ध्रुव ऊर्फ सनी अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. PTI ने यासंदभात वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी नागरिकांना ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा बदलून दिल्यास अतिरिक्त पैशांचे आमिष दाखवत असत. या आमिषाला बळी पडणाऱ्या व्यक्तीला ते बनावट नोटांचे असे बंडल देत असत, जे वरवर पाहता अगदी खऱ्या नोटांसारखेच दिसायचे. या बंडल्सची रचना इतकी हुबेहूब होती की, समोरच्या व्यक्तीचा त्याच्यावर सहज विश्वास बसायचा आणि ती खऱ्या नोटा समजत असे.

अशाच प्रकारे या टोळीने एका व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याच्याकडून ५० हजार रुपये घेऊन त्याला त्या बदल्यात बनावट नोटांचे बंडल दिले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या व्यक्तीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली आणि या फसवणुकीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या तिघांना बेड्या ठोकल्या. या आरोपींनी अशाच प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, तसेच हे बनावट नोटांचे रॅकेट कुठून चालवले जात होते, याचा सखोल तपास आता दिल्ली पोलीस करत आहेत.