आयपीएल स्टार अभिषेक पोरेलला अटक, लग्नाचे वचन देऊन फसवल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अभिषेक पोरेलला एका मुलीला लग्नाचे वचन देऊन तिची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हुगळी जिह्यातील पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत हुगळी (ग्रामीण) पोलीस अधीक्षक कुमार भूषण सिंग म्हणाले, ‘‘अभिषेकच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्या अटकेसाठी न्यायालयाचा आदेश होता. त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.’’

पोरेलला मोगरा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. त्याला मंगळवारी चिन्सुरा येथील न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता होती. सूत्रांनी सांगितले की, पोलिसांनी क्रिकेटपटूवर भारतीय दंड संहितेच्या कलम 69 सह अनेक कलमांखाली आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींखाली गुन्हा दाखल केला आहे.

23 जूनला तक्रार दाखल

कर्नाटकातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीने 23 जूनला मोगरा पोलीस ठाण्यात पोरेलच्या विरोधात तक्रार दाखल केली. तिने आरोप केला आहे की, ते दोघे सुमारे साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते आणि लग्न करण्याची योजना आखत होते. पण त्याने फसवले. तिच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपांची चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलीस पथकांनी चंदन नगरमधील पोरेलच्या घरी अनेक वेळा भेट दिली, पण तो तिथे आढळला नाही.

अभिषेकची कारकीर्द कशी आहे

अभिषेक हा हिंदुस्थानचा डावखुरा यष्टिरक्षक-फलंदाज असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो. त्याने 2021-22 हंगामात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून 32 प्रथम श्रेणी आणि 23 लिस्ट ए सामने खेळले आहेत. तो हिंदुस्थानी ‘अ’ संघाचा भागही राहिला असून संघासोबत त्याने यूके आणि ऑस्ट्रेलियाचा दौराही केला आहे. आयपीएलमध्ये तो 2023पासून दिल्ली कॅपिटल्स संघाशी जोडला गेला आहे, जिथे त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत 35 सामन्यांमध्ये 25.63च्या सरासरीने आणि 145.36च्या स्ट्राइक रेटने एकूण 769 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2026 साली 4 डावांमध्ये केलेल्या 108 धावांचाही समावेश आहे.