गुरनूर ब्रार ठरू शकतो हुकमी एक्का, श्रीलंकेच्या माजी खेळाडूने केले काैतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू परवेझ महरूफने युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला भारतीय संघाचा संभाव्य हुकमी एक्का म्हटले आहे. त्याने सांगितले की, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत या 26 वर्षीय खेळाडूला कसोटी पदार्पणाची संधी दिली पाहिजे. शनिवारी गॉल येथे सुरू होणाऱ्या हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी महरुफचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण समजले जात आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून मायदेशात 0-2 ने मालिका गमावल्यानंतर हिंदुस्थान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण मालिकेत संघ दुखापतग्रस्त बुमराशिवाय खेळेल. महरूफने पत्रकार परिषदेत सांगितले की, जुन्या चेंडूला रिव्हर्स स्विंग करण्याची बुमराकडे क्षमता होती. पण आता तो या मालिकेत खेळू शकणार नसल्यामुळे संघाला त्याचे मोठे नुकसान होऊ शकते.

जसप्रीत बुमराहची उणीव भासेल

महरुफ म्हणाला की, ‘बुमरा ज्या प्रकारे जुन्या चेंडूने रिव्हर्स स्विंग निर्माण करतो, ते हिंदुस्थानसाठी एक मोठे अस्त्र आहे आणि त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. त्याची बळी घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. मोहम्मद सिराज एक चांगवा गोलंदाज आहे, पण दोघांची तुलना केल्यास फरक स्पष्टपणे दिसतो. गुरनूर ब्रारची उंच शरीरयष्टी, अतिरिक्त उसळी, उच्च वेग आणि आक्रमक वृत्ती त्याला हिंदुस्थानचा हुकमी एक्का बनवू शकते. मला गुरनूरची गोलंदाजी भावली. त्याच्या गोलंदाजीत उसळी, वेग तर आहेच, पण त्याच्याकडे असेलली झुंजार वृत्ती सर्वात महत्त्वाची वाटते. तो फलंदाजांसाठी खूप धोकादायक ठरू शकतो. सराव सामन्यात त्याने अस्वस्थ केले होते.’

महरूफ पुढे म्हणाला की, ‘जर मी हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाचा भाग असतो, तर मी ब्रारला संधी देण्याचा नक्कीच विचार केला असता.जरी त्याने हिंदुस्थानसाठी फक्त मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळले असले तरी, त्याच्यामध्ये फलंदाजांची लय बिघडवण्याची आणि कमी वेळेत सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता आहे.’