आता ‘जन गण मन’आधी ‘वंदे मातरम्’ गायले जाणार, राष्ट्रपती मुर्मू यांची विधेयकाला मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताप्रमाणे कायदेशीर संरक्षण देणारे ‘राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मंजूर केले. विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले असून शासकीय कार्यक्रमांमध्ये आता ‘जन गण मन’आधी ‘वंदे मातरम्’ गायले जाणार आहे. तसे न केल्यास किंवा त्यात अडथळा आणल्यास तो गुन्हा ठरणार आहे.

लोकसभेत हे विधेयक 30 जुलै रोजी तर राज्यसभेत 29 जुलै रोजी मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर आज राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यास मंजुरी दिली. यामुळे राष्ट्रगीत ‘जन गण मन’एवढाच दर्जा ‘वंदे मातरम’ला मिळाला आहे. 24 जानेवारी 1950 रोजी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला राष्ट्रगीताएवढाच सन्मान आणि दर्जा मिळायला हवा, असे देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेत म्हटले होते. याचा विधेयकात आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार ‘वंदे मातरम’ न म्हणो किंवा त्यात अडथळा आणल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात. लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम्’चा जयघोष होणे हा देशातील नागरिकांसाठी प्रेरणादायी क्षण ठरणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

केंद्रीय गृहमंत्रालयाने 28 जानेवारी रोजी वंदे मातरम् म्हणण्यासंदर्भात नियमावली जारी केली होती. त्यानुसार, सर्व शासकीय कार्यक्रम, राष्ट्रपतींचे आगमन, ध्वजारोहाण, राज्यपालांचे अभिभाषण इत्यादी वेळी 3.10 मिनिटांचे सहा कडवे असलेले ‘वंदे मातरम्’चे गायन अनिवार्य असेल. तसेच राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत ज्यावेळी गायले जाईल, त्यावेळी राष्ट्रीय गीत अर्थात वंदे मातरम् आधी गायले जाईल, असे या आदेशात म्हटले होते.