
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर संसदेतील त्यांच्या सततच्या अनुपस्थितीवरून सडकून टीका केली आहे. “जे लोक दुसऱ्यांना धमकावतात आणि घाबरवतात, ते स्वतःच भित्रे असतात,” असा घणाघाती आरोप रमेश यांनी शहांवर केला आहे. ANI ने यासंदभात वृत्त दिले आहे.
जयराम रमेश यांनी मंगळवारी लोकसभेतील कामकाजाचा संदर्भ देत अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. कामकाजाच्या यादीत नाव नोंदवलेले असूनही अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, याकडे लक्ष वेधत रमेश यांनी म्हणाले की, गृहमंत्री गेल्या १७ दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गैरहजर आहेत. या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रमेश यांनी विचारले की, “अमित शहा यांची प्रकृती तर ठीक आहे ना? आणि पंतप्रधान व गृहमंत्री यांच्यामध्ये सर्व काही आलबेल आहे का?”
गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर गृहमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र शहा यांनी यावर मौन बाळगले आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.





























































