
आगामी एफआयएच पुरुष आणि महिला हॉकी वर्ल्ड कपचा चेहरामोहराच बदलला आहे. 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱया या स्पर्धेत पारंपरिक उपउपांत्य फेरी पूर्णपणे हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येक साखळी सामना थेट उपांत्य फेरीच्या गणितावर परिणाम करणार आहे.
या हॉकी वर्ल्ड कपमध्ये पुरुष आणि महिला गटात 16-16 संघ, चार पूल आणि सुरुवातीला साखळी सामने. त्यानंतर पूल ए आणि डीमधील अव्वल दोन संघ पूल ईमध्ये, तर बी आणि सीमधील अव्वल दोन संघ पूल एफमध्ये जातील. सर्वात धक्कादायक नियम म्हणजे पहिल्या टप्प्यातील परस्पर सामन्याचा निकाल आणि गुण पुढच्या टप्प्यातही कायम राहणार. म्हणजे सुरुवातीला मिळालेले तीन गुण आघाडीच्या संघांना थेट सेमीफायनलच्या दारात नेऊ शकतात.
हिंदुस्थानी पुरुष संघ इंग्लंड, पाकिस्तान आणि वेल्ससोबत पूल डीमध्ये आहे. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान सामना केवळ प्रतिष्ठेचा नाही, तर पुढच्या टप्प्यात गुण घेऊन जाण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. हिंदुस्थानी महिला संघालाही चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कठीण आव्हान आहे.
महिला प्रशिक्षक स्योर्ड मारिजने यांनी उपउपांत्य फेरी हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली, तर पुरुष प्रशिक्षक व्रेग फुल्टन यांनी स्पष्ट इशारा दिला की, गोल फरक आणि प्रत्येक विजय आता जिवावर बेतणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला सुरुवातीपासूनच आपल्या खेळात सातत्य ठेवावे लागणार आहे. गोलांचा पाऊस पाडावा लागणार आहे नाहीतर वर्ल्ड कपची स्वप्ने पहिल्या टप्प्यातच कोसळण्याचे संकट ओढावू शकते.
या वर्ल्ड कपची उपांत्य फेरी 27-28 ऑगस्टला, 29 ऑगस्टला महिलांचा अंतिम सामना, तर 30 ऑगस्टला बेल्जियममध्ये पुरुष जगज्जेत्याचा फैसला होणार आहे. स्पर्धेचे बदलले रूप अनेक संघांचे चेहरेही बदलू शकते, याची सर्वांना आतापासूनच कल्पना आली आहे.





























































