लेख – युवकांची व्यसनाधीनता : देशासमोरील आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे  [email protected]

स्वामी विवेकानंदांनी तरुणांना ‘ऊठ, जागा हो आणि ध्येय सिद्ध होईपर्यंत थांबू नकोस’ असा संदेश दिला होता. आजच्या जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने आपल्या देशातील तरुणांनी स्वतःला एक प्रश्न विचाराला हवा आहे की, आपण ध्येयाच्या दिशेने चाललो आहोत की व्यसनाच्या अंधाऱ्या खाईकडे? व्यसन हे सुखाचे साधन नसून विनाशाचे आमंत्रण आहे. तरुणांनी स्वतःच्या आंतरिक शक्तीला ओळखून व्यसनांना ’नाही’ म्हणण्याचे धाडस दाखवले पाहिजे. जेव्हा देशाचा प्रत्येक तरुण व्यसनमुक्त, सुदृढ आणि ध्येयवादी बनेल, तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करेल.

तरुण पिढी हा देशाचा कणा आणि भविष्यातील प्रगतीचा आधारस्तंभ असतो, असे आपण अभिमानाने सांगतो. ज्या देशात तरुणांची संख्या जास्त तो देश सर्वात शक्तिशाली मानला जातो. देशाच्या प्रगतीचे सुकाणू युवकांच्या हाती आहे असे म्हटले जाते. युवा शक्तीचे खूप मोठे सामर्थ्य आहे. ते जर चांगल्या उद्देशाने एकत्र आले तर खूप काही चांगले घडू शकते. भारत हा जगातील सगळ्यात मोठा तरुणांचा-युवकांचा देश आहे.

मात्र याच बलशाली युवा शक्तीला ’व्यसनाधीनतेची’ वाळवी पोखरत आहे. एकीकडे आपण तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि जागतिक प्रगतीच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे देशातील कोटय़वधी तरुण अमली पदार्थ, दारू, सिगारेट आणि डिजिटल स्क्रीनच्या विळख्यात अडकत आहेत. अडकले आहेत. युवकांची ही सद्यस्थिती केवळ एका व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे नुकसान करणारी नसून संपूर्ण राष्ट्राच्या भविष्याला अंधारात ढकलणारी आहे. व्यसनाधीनतेचे स्वरूपही बदलले आहे. पूर्वी व्यसन म्हटले की केवळ तंबाखू, सिगारेट किंवा दारू डोळ्यांसमोर यायची. मात्र आजच्या आधुनिक युगात व्यसनांचे स्वरूप अत्यंत घातक झाले आहे.

आज महाविद्यालयीन तरुणांमध्ये एमडी (MD), कोकेन, गांजा, चरस आणि विविध प्रकारच्या अमली गोळ्यांचे फॅड प्रचंड वाढले आहे. पार्टी संस्कृतीच्या नावाखाली ड्रग्जचे सेवन करणे ही एक ‘फॅशन’ किंवा ‘स्टेटस सिम्बॉल’ बनत चालले आहे. सिगारेट, हुक्का आणि ई-सिगारेटची तरुणांना भुरळ पाडली आहे. वीपेंड पाटर्य़ा, पब्स आणि काwटुंबिक सोहळ्यांमध्येही मद्यपान उघडपणे केले जात आहे. रील्स पाहणे, ऑनलाइन गेमिंग (उदा. पबजी, रमी ), पॉर्नोग्राफी आणि सोशल मीडियावरील लाईक्स मिळवण्यासाठी तासन्तास मोबाईल स्क्रीनवर घालवणे, हे तरुणांच्या मानसिक आरोग्याला घातक ठरत आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापायी अनेक तरुण ऑनलाइन बेटिंग अॅप्सच्या आहारी जात आहेत. यामध्ये मोठी रक्कम गमावल्यामुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत.

देशातील तरुण व्यसनाच्या आहारी का जात आहेत? तर तरुणांना व्यसनाच्या गर्तेत ढकलण्यासाठी अनेक काwटुंबिक, सामाजिक आणि मानसिक घटक कारणीभूत आहेत. आजच्या जगात शिक्षणाची स्पर्धा, बेरोजगारीची भीती, करीअरचे दडपण आणि पालकांच्या अति अपेक्षांमुळे तरुण प्रचंड मानसिक तणावाखाली जगतात. या तणावातून तात्पुरती सुटका मिळवण्यासाठी ते व्यसनाचा मार्ग निवडतात. मित्रपरिवाराचा दबाव हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. चमचमती जीवनशैली आणि चित्रपट-वेब सीरिज, चित्रपट आणि लोकप्रिय वेब सीरिजमध्ये अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान ग्लॅमराईज करून दाखवले जाते. नायक किंवा नायिका पडद्यावर सिगारेट ओढताना पाहून तरुण त्यांचे अंधानुकरण करतात. कौटुंबिक वातावरण आणि संवादाचा अभाव असतो. ज्या कुटुंबात पालकांमध्ये सतत भांडणे असतात किंवा पालक स्वतः व्यसनी असतात, तिथली मुले सहज व्यसनांकडे वळतात. आजकाल पालक आणि मुलांमध्ये संवाद कमी झाला आहे. मुले डिप्रेशनमध्ये असताना त्यांच्याशी बोलणारे कोणी नसते. अमली पदार्थांची सहज उपलब्धता होत असल्याने आज शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अगदी पान टपऱ्यांवर किंवा ऑनलाइन माध्यमातून ड्रग्ज आणि इतर व्यसनाधीन वस्तू सहज उपलब्ध होत आहेत. ड्रग्ज माफियांचे जाळे थेट शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचले आहे.

व्यसनाधीनतेचे भयानक परिणाम व्यसनाधीनतेमुळे केवळ तरुणाचे शारीरिक नुकसानच होत नाही, तर त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उद्ध्वस्त होते. गुन्हेगारीत वाढ होते. व्यसनाची गरज भागवण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. जेव्हा घरून पैसे मिळणे बंद होते, तेव्हा तरुण चोरी आणि अमली पदार्थांची तस्करी यांसारख्या गुन्हेगारी मार्गांकडे वळतात. व्यसनात बुडालेला तरुण अभ्यासावर लक्ष पेंद्रित करू शकत नाही. उच्च शिक्षण अर्धवट सुटते, नोकरी गमावली जाते आणि यामुळे संपूर्ण कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटते.कुटुंबाची वाताहत होते. या गंभीर समस्येवर प्रभावी उपाय युवकांना व्यसनाच्या या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केवळ कायदे करून चालणार नाही, तर सामूहिक पातळीवर प्रयत्न करावे लागतील.
शाळा-कॉलेजच्या 100 मीटर परिसरात तंबाखू आणि दारू विक्रीवर असणारी बंदी केवळ कागदावर न राहता तिची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. कठोर कायद्यांसोबत त्यांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. शैक्षणिक संस्था व संस्था चालक यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
जे तरुण व्यसनाच्या जाळ्यात खोलवर रुतले आहेत, त्यांना सहानुभूतीपूर्वक बाहेर काढण्यासाठी आधुनिक व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन पेंद्रांची मदत घेतली पाहिजे. तरुणांची ऊर्जा अफाट असते. जर या ऊर्जेला क्रीडा, कला, व्यायामशाळा किंवा सामाजिक,आध्यात्मिक कार्यात गुंतवले तर त्यांचे मन व्यसनाकडे वळणारच नाही. क्रीडा आणि कलागुणांना प्रोत्साहन द्यायला हवे.

रोजगार नसलेल्या युवकांचा राजकीय क्षेत्रात तात्पुरता वापर केला जातो. युवक त्यात आशेपोटी गुरफटला आहे. आंदोलन, मोर्चे या कामीच त्यांचा फक्त वापर वर्षानुवर्षे करून घेतला जातोय ही गंभीर बाब आहे. त्यातच त्याच्या सामाजिक जाणिवा बोथट झाल्या आहेत. समाजातला अत्याचार, भ्रष्टाचार याबद्दल त्याला काही घेणे देणे नाही. तो पेटून उठत नाही. त्यांच्या जाणिवाही बोथट झाल्या आहेत.

स्वामी विवेकानंदांनी तरुणांना ‘ऊठ, जागा हो आणि ध्येय सिद्ध होईपर्यंत थांबू नकोस’ असा संदेश दिला होता. आजच्या जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने आपल्या देशातील तरुणांनी स्वतःला एक प्रश्न विचाराला हवा आहे की, आपण ध्येयाच्या दिशेने चाललो आहोत की व्यसनाच्या अंधाऱ्या खाईकडे? व्यसन हे सुखाचे साधन नसून विनाशाचे आमंत्रण आहे. तरुणांनी स्वतःच्या आंतरिक शक्तीला ओळखून व्यसनांना ’नाही’ म्हणण्याचे धाडस दाखवले पाहिजे. जेव्हा देशाचा प्रत्येक तरुण व्यसनमुक्त, सुदृढ आणि ध्येयवादी बनेल, तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने प्रगती करेल.