
उत्तर प्रदेशात झालेल्या पावसानंतर नव्याने उभारलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘जिथे जिथे भाजपचे सरकार, तिथे तिथे महाघोटाळा ‘ समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका केली, तर विमानतळ प्रशासनाने ‘तात्पुरते साचलेले पाणी’ ३० मिनिटांत काढून टाकण्यात आल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये जवर येथील विमानतळावर टर्मिनलला पार्किंग परिसराशी जोडणाऱ्या मार्गाच्या एका भागात पाणी साचलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आला असून, विमानतळ कर्मचारी पाणी बाहेर काढण्याचे काम करताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बुधवारी सकाळी एक्सवर असाच एक व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘आता विमानतळावर बोटी चालणार का? जिथे जिथे भाजपचे सरकार आहे, तिथे तिथे महाघोटाळा आहे!’
अब क्या एअरपोर्ट पर नाव चलेगी?
जहाँ भाजपा सरकार, वहाँ महा-भ्रष्टाचार! pic.twitter.com/pahOv7dmd5
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 12, 2026
मात्र, विमानतळ प्रशासनाने सांगितले की, मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही काळ पाणी साचले होते आणि त्यामुळे विमान उड्डाणे किंवा प्रवाशांच्या हालचालींवर कोणताही परिणाम झाला नाही.
यावर्षी २८ मार्च रोजी उद्घाटन झालेला हा ग्रीनफिल्ड विमानतळ उत्तर प्रदेश सरकारसोबतच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीत विकसित करण्यात आला असून, तो आंतरराष्ट्रीय दर्जानुसार उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.






























































