
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न विचारत जोरदार निशाणा साधला आहे. गडचिरोलीत एका आश्रमशाळेत तीन मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या प्रकरणी संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. 1500 आदिवासी लोक खाणमाफियांच्या ट्रकखाली चिरडली आहेत ही बाब मुख्यमंत्र्यांना माहित आहे का? मंत्रिमंडळात बसून मंत्री करतात तरी काय? याचा जाब मुख्यमंत्र्यांनी विचारला पाहिजे असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, आदिवासी पाडे, आदिवासींच्या शाळा आणि त्यांच्या आश्रमशाळांवर सरकार यावर सरकार मोठ्या प्रमाणात निधी देतं. आणि सर्वाधिक भ्रष्टाचार त्याच खात्यात होतो. जे आदिवासींचे अन्न आणि सुविधा ओरबाडतात , ते सैतान असायला पाहिजे. तुम्ही मागासवर्गीय आणि आदिवासी मुलांचे हक्क हिरावून घेत आहात, ज्यांनी स्वातंत्र्याचा सूर्यही अजून पाहिलेला नाही. असे अनेक आदिवासींचे पाडे राज्यात आणि देशात आहेत. त्यांच्यावर खाण उद्योजकांचं आक्रमण होत आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
86 हजार एकर जमीन अदानीसाठी मोकळी केली अशी कालची बातमी असून ही अतिशय गंभीर बाब आहे. मग अशा वेळी आदिवासींनी जायचं कुठे ? जंगलात राहणाऱ्या आदिवासींना तुम्ही शहरात घेत नाहीत. त्यांना नोकऱ्या देत नाहीत, त्यांच्या मुलाबाळांना मुख्यप्रवाहात सामावून घेत नाहीत. आश्रमशाळेत त्या लहान मुलांना साधा बेड देऊ शकत नाहीत. यावर सरकारचा पैसा खर्च होतोय. काल सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू झाला आणि दोन मुलींची प्रकृती गंभीर आहे. सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना काय मदत केली याबाबत मला माहित नाही. दंगलीत मेलेल्यांना आणि मारलेल्यांना तुम्ही नुकसानभरपाई देता. मग सर्पदंशाने मृत पावलेल्या मुलींच्या पालकांनाही मदत द्या. यापुढे अशा प्रकारची दुर्घटना घडणार नाही, याची जबाबदारी ठरवा. त्या खात्यातला मंत्र्याला बडतर्फ करा. आदिवासी मंत्री मंत्रिमंडळात बसून करतात तरी काय? धर्मराव आत्राम, नरहरी झिरवाळ काय करतात? विषेशतः याचा जाब मुख्यमंत्र्यांनी विचारला पाहिजे. बाकी लूटमार चालूच असते. पण आदिवासींना तरी सोडा.
तसेच देशात आणि राज्यात त्या खात्यावरची व्यक्ती त्या खात्याला वाहून घेतलेली असावी. शिक्षण, आदिवासी, सामाजिक, पुर्नवसन न्याय ही समाजातल्या शोषित वर्गासाठी तयार झालेली खाती आहेत. तिथेच सर्वाधिक भ्रष्टाचार होत असेल तर गोरगरीबांनी कुणाकडे पहायचं? पैसे खाण्यासाठी चार खाती आहेत ना तुमच्याकडे, किमान ही खाती तरी सोडा, असेही संजय राऊत म्हणाले.
1500 आदिवासी लोक खाणमाफियांच्या ट्रकखाली चिरडली आहेत ही बाब मुख्यमंत्र्यांना माहित आहे का? माझा आकडा चुकलेला नाही. आदिवासींच एक शिष्टमंडळ मला भेटलं, त्यांनी मला माहिती दिली की दीड हजार आदिवासी ट्रकखाली मारले, त्यांचे पुरावेही नष्ट केले. त्या भागात मी जाणार आहे. हे प्रशासन निर्ढावलेलं असून खाण माफियांना जो कलेक्टर हवाय तोच तिथे आणला जातो, सरकारचा प्रतिनिधी तिथे नसतो. जिल्हाधिकारी आणि तिथला प्रशासन हे तिथल्या खाण उद्योजकांना तिथले पगारी नोकर त्या पदावर बसवले जातात, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.





























































