
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देशातील तरुण पिढीला कोणत्याही पोकळ भाषणात किंवा प्रवचनात रस नसून त्यांना केवळ घडलेल्या घटनांचे सत्य जाणून घ्यायचे आहे, अमित शहा यांच्यात हिंमत नाही. देशाचे गृहमंत्री संसदेचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या पॅलेट गन्सचा वापर आणि लाठीचार्ज प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यावर करण्यात आलेल्या लाठीचार्जबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांवर गोळीबार कोणी केला? गोळीबार करण्याचे आदेश नेमके कोणी दिले? एका विद्यार्थ्याचा डोळा फोडणारा आणि दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कानावर गोळी मारणारा कोण? विद्यार्थ्यांना खिळे लावलेल्या लाठ्यांनी मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले? हे आदेश कोणाचे होते? असा संतप्त सवाल करत त्यांनी अमित शहांवर टीका केली आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, हे आदेश गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून दिले गेले, हे दोन्ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. मग अमित शहा यांनी आमच्या मुलांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले की नाही? जर त्यांनी हे आदेश दिले असतील, तर ते या गुन्ह्यासाठी जबाबदार आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जर त्यांनी हे आदेश दिले नसतील, तरीही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण ते आपली यंत्रणा सांभाळण्यात पूर्णपणे अपयशी आणि अकार्यक्षम ठरले आहेत, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.
पुढे राहुल गांधी म्हणाले की, आता अमित शहा काय बोलत आहेत, याने कोणताही फरक पडत नाही, कारण ते तब्बल वीस दिवस गायब होते. ते संसदेतच होते पण सभागृहाचा सामना करण्याचे टाळत होते. त्यांच्या दिमतीला तीस गाड्यांचा ताफा होता आणि विद्यार्थ्यांच्या रोषापासून वाचण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर हजार पोलिसांचा पहारा उभा करण्यात आला होता, जेणेकरून कोणताही विद्यार्थी तिथे पोहोचू शकणार नाही. राजकीय प्रभावाचा फुगा आता पूर्णपणे फुटला असून, शेवटच्या क्षणी त्यात हवा भरण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी आता काहीही साध्य होणार नाही. देशाचे गृहमंत्री संसदेचा सामना करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत, असा घणाघाती आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.





























































