
कॉक्रोच जनता पार्टीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांनी केलेला लाठीहल्ला तसेच राम मंदिर घोटाळ्याप्रकरणी देशाचे राजकारण तापले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशनात या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करत विरोधकांनी सरकारला घेरले. मात्र, अधिवेशन सुरू होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा एकदाही संसदेत उपस्थित राहिलेले नाही. त्यामुळे विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारच्या या बेजबाबदारपणावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सडकून टीका केली आहे. आम्हाला भाषण ऐकायचं नाही, सभागृहात येऊन निवेदन द्या; अशी मागणी यावेळी मोईत्रा यांनी केली.
संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, आमची पहिल्या दिवसापासून एकच मागणी आहे आणि ती संपूर्ण देशाची आहे. 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या संसदेवरील आंदोलनात लाठीहल्ला झाला, आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पेलेटगनचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या या हल्ल्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्री अमित शहा दोन आठवडे संसदेत आलेले नाहीत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा दोघेही तोंड लपवून संसदेपासून पळ काढत असल्याची टीका महुआ मोईत्रा यांनी केली.
विरोधी पक्षाकडून सरकारकडे केवळ एका निवेदनाची मागणी केली जात असल्याचे स्पष्ट करत त्या म्हणाल्या, “आम्ही त्यांच्याकडून नेहरूंवर किंवा आणीबाणीवर कोणतेही लेक्चर मागितलेले नाही. त्यांनी संसदेत येऊन स्पष्ट निवेदन द्यावे की, पेलेटगन आणि लाठीहल्ल्याचे आदेश त्यांनी दिले होते का? जर त्यांनी हे आदेश दिले नसतील तर, मग त्यांच्या मंत्रालयातून हे आदेश कोणी दिले? पोलीस वरिष्ठांच्या आदेशाशिवाय लाठीहल्ला करूच शकत नाहीत, असे यावेळी त्या म्हणाल्या.
#WATCH | Delhi | TMC MP Mahua Moitra says, “Amit Shah has been running away from the Parliament. We are demanding a statement from him on who ordered the use of pellet guns on protestors at Jantar Mantar. They (the govt) are also not holding a discussion on the Ram temple issue.… pic.twitter.com/EPGaWhh2ud
— ANI (@ANI) August 12, 2026
विरोधी पक्ष सातत्याने संसदेत येत असताना गृहमंत्री सभागृहात येण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “आम्ही त्यांना संसदेत येण्यापासून थांबवत आहोत का? अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांना संसदेचा रस्ता माहीत नाही का? की लोकसभा कुठे आहे, हे त्यांना पत्र लिहून सांगावे लागेल? अशी खरमरीत टोला त्यांनी लगावला. सरकारची इच्छा आहे की अमित शहांनी यावे, दोन तास भाषण करावे आणि आम्ही ते ऐकून घ्यावे; पण आम्हाला त्यांचे भाषण ऐकायचे नाही तर, स्पष्टीकरण हवे आहे, अशी मागणी महुआ मोईत्रा यांनी केली.
यासोबतच राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “ज्या राम मंदिर उभारणीची घोषणा पंतप्रधान मोदींनी स्वतः लोकसभेत केली होती आज त्याच राम मंदिरात देणगी घोटाळा झाला आहे. कोट्यवधी रुपये चोरीला गेले आहेत. पण या गंभीर विषयावर सरकार चर्चा करायला तयार नाही,” असा गंभीर आरोप महुआ मोईत्रा यांनी केला.




























































