एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड, प्रवासी सहा तास कोलकाता विमानतळावर अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. सहा तास प्रवासी विमानतळावर अडकले. या प्रकारामुळे संतप्त प्रवाशांमध्ये विमानतळावर निदर्शने केली. एअर इंडिया एक्सप्रेसचे हे विमान बुधवारी सकाळी कोलकात्याहून चेन्नईला चालले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान रद्द करण्यात आले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडिया एक्सप्रेसचे IX1254 हे विमान बुधवारी सकाळी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरून चेन्नईसाठी उड्डाण घेणार होते. प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात आले. प्रवासी विमानात बसले. मात्र बराच वेळ वाट पाहिल्यानंतर प्रवाशांना अचानक उड्डाण रद्द झाल्याचे सांगत खाली उतरवण्यात आले. उड्डाण रद्द झाल्याचे कळताच संतप्त प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला.

तांत्रिक बिघाडामुळे विमान वेळेवर उड्डाण करू शकले नाही, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले. अगदी कमी वेळेत पर्यायी विमानाची व्यवस्था करणे शक्य नव्हते, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, एअर इंडिया एक्सप्रेसने तांत्रिक बिघाडाचे नेमके स्वरूप स्पष्ट केले नाही.