बनावट दस्तावेज बनवणारी टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन ते अडीच हजार रुपये घेऊन बनावट दस्तावेज बनवून देणाऱ्या चौघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. सूरजकुमार यादव, उपेंद्र सिंग, सत्यम मिश्रा आणि आकाश पटवा अशी त्या चौघांची नावे आहेत. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

दहिसर येथे बनावट दस्तावेज तयार करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही टोळी नागरिकांना आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालय सोडल्याचा दाखला आणि इतर दस्तावेज दोन ते अडीच हजारांत बनवून देत आहे. त्या माहितीची सत्यता पडताळली. पोलिसांनी एका खासगी कार्यालयात बोगस ग्राहकाला पाठवले. त्या ग्राहकाने आधारकार्डसाठी अर्ज केला. त्याला कांदिवली येथील एका सेंटरवर नेण्यात आले. तिथे त्याला अडीच हजार रुपयांत आधारकार्ड बनवून दिले. वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मारुती सांगळे, सहाय्यक निरीक्षक नीलेश साळुंखे, भलकारे, भागवत, राठोड, गावडे यांच्या पथकाने तपास करून आरोपींना अटक केली.