
राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेरच्या अमराठी चालकांची आता खैर नाही. त्यांना मराठी बोलता आले नाही तर त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार असून पुनः पुन्हा नियमभंग केल्यास परवाना कायमचा रद्द होणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम, १९८९ मध्ये तशी स्पष्ट सुधारणा करण्यात आली आहे. आता त्याचे नामकरणही “महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६” असे करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे १५ ऑगस्टनंतर होणारी कारवाई आरटीओला अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमात विविध महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिली. या अधिनियमातील नियम ४ मध्ये व्यावहारिक मराठीचे ज्ञान हे शब्द समाविष्ट करून अमराठी चालकांना कायद्याने मराठीची सक्ती केली गेली आहे. यापुढे परवान्यासाठी अर्ज करताना संबंधित व्यक्तीकडे मराठी भाषेच्या व्यावहारिक ज्ञानाची पात्रता असावी लागणार आहे.
मोटार कॅब चालकांसाठी स्वतंत्र तरतूद
नियम २२ मध्ये बदल करून अॅप आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. नियम २२ (३ए) नुसार, अशा मोटार कॅबच्या चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे बंधनकारक राहणार आहे. मराठीचे ज्ञान नसल्यास त्याच्यावर कारवाईचे अधिकार आरटीओला देण्यात आले आहेत.
परमिट रिन्यू करतानाही मराठीची तपासणी होणार
महाराष्ट्र मोटार वाहन नियमांच्या नियम ७८ मधील नव्या तरतुदीनुसार, परमिटधारक चालकांनाही मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियम ८५ मध्ये करण्यात आलेल्या नव्या तरतुदीनुसार, अॅप आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या मोटार कॅबच्या परमिटचे नूतनीकरण करतानाही मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे. समाधानकारक मराठी बोलता यायला हवी, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.






























































