
निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा (एसआयआर) कालावधी 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. शेवटचे पाच दिवस उरले असताना अजूनही सुमारे 37 लाख मतदारांची पुनरीक्षण प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे 17 ऑगस्टपर्यंत संबंधित मतदारांच्या घरोघर जाऊन तपासणी करण्याचे निर्देश बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना (बीएलओ) देण्यात आले आहेत, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज सांगितले.
मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघात एस. चोक्कलिंगम यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून एसआयआर मोहिमेबाबत माहिती दिली. राज्यात एसआयआरची 3.78 टक्के कार्यवाही शिल्लक आहे. अद्याप 36 लाख 95 हजार 199 मतदारांची एसआयआर तपासणी करायची आहे. या मतदारांनी 17 ऑगस्टपर्यंत ती पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे. तसेच कोणताही पात्र मतदार वगळला जाऊ नये यासाठी योग्य रीतीने पडताळणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात एकूण 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार आहेत. त्यातील 99.8 टक्के म्हणजे 9 कोटी 69 लाख 54 हजार 766 मतदारांना प्रपत्र वाटप करण्यात आली आहेत. अद्याप 8 लाख 99 हजार 283 मतदारांनी प्रपत्र घेतलेले नाही. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत याविषयीच्या हरकती आणि सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन नाव समाविष्ट करण्याबरोबरच नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकामध्ये बदल करणे आदी सुधारणा करता येणार आहेत. 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने दावे आणि हरकती निकालात काढल्या जाणार आहेत आणि 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती चोक्कलिंगम यांनी दिली.
गणना पत्र भरून देण्यासाठी सध्या संबंधित नागरिक त्या ठिकाणी वास्तव्यास असणे महत्त्वाचे आहे. गणना प्रपत्र उपलब्ध न होऊ शकलेल्या मतदारांची ‘अनकलेक्टेबल’ यादी जिल्हानिहाय आणि मतदारसंघातील भागनिहाय प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामध्ये मृत्यू, स्थलांतर, दुबार नोंद, संबंधित मतदार उपलब्ध नसणे किंवा अन्य कारणांमुळे गणना प्रपत्र प्राप्त न झालेल्या मतदारांचा समावेश आहे. ही यादी जिह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले.
नवमतदारांना 24 ऑगस्टनंतर संधी
24 ऑगस्ट 2026नंतर पात्र नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. 18 वर्षे पूर्ण झालेले तसेच अन्य जिह्यातून किंवा राज्यातून स्थलांतरित झालेले आणि पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेले नागरिकही या संधीचा लाभ घेऊ शकणार आहेत.
वरळीतील 40 टक्के, मानखुर्दमधील 42 तर शीव कोळीवाड्यातील 43 टक्के मतदार गायब
मुंबईतील एसआयआर प्रक्रियेबाबत आज महत्त्वाचा तपशील समोर आला. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिह्यांचा विचार करता आतापर्यंत 63 टक्के गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. सुमारे 30 टक्के गणना पत्रे जमा झालेलीच नाहीत. वरळीतील 40 टक्के, मानखुर्दमधील 42 तर शीव कोळीवाड्यातील 43 टक्के मतदार बीएलओंच्या तपासणीत घरी अनुपस्थित असल्याचे आढळले.




























































