
>> पराग खोत
नाटक म्हणजे कथा, व्यक्तिरेखा, संवाद, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत यांचा मेळ, अशी रंगभूमीची रूढ व्याख्या. पण या सगळ्या चौकटी बाजूला सारून केवळ भाषेच्या सामर्थ्यावर रंगमंचीय प्रयोग उभा राहू शकतो का?
‘पुष्पाचे प्राक्तन’ हे आगळेवेगळे प्रायोगिक नाटक त्याचे उत्तर ठामपणे ‘हो’ असे देते. लेखक-दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे यांनी मराठी भाषेतील ‘प’ या एका अक्षराला केंद्रस्थानी ठेवून केलेला हा भाषिक पराक्रम आता रंगमंचावर साकारला आहे.
‘पुष्पाचे प्राक्तन’ची गंमत त्याच्या कथेत कमी आणि ती कथा सांगण्यासाठी वापरलेल्या भाषिक तंत्रात अधिक आहे. तब्बल १७५० शब्दांची संहिता आणि त्या संहितेतील प्रत्येक शब्द ‘प’ या अक्षरापासून सुरू होणारा आहे. अनुप्रास अलंकाराचा असा विलक्षण विस्तार यापूर्वी मराठीतच काय, इतर कुठल्याही भाषेत झालेला नाही. २०१३ मध्ये या साहित्यकृतीची नोंद ‘रेकॉर्ड होल्डर्स रिपब्लिक, लंडन’ येथे विश्वविक्रम म्हणून झाली आहे, हे विशेष.
शिंत्रे यांच्या नावावर यापूर्वी मराठीतील सर्वांत मोठे, सव्वा लाख चौकटींचे शब्दकोडे आणि ‘क ते ज्ञ’ या मराठी व्यंजनांचा समावेश असलेल्या सर्वांत छोट्या वाक्यरचनेचे विक्रमही नोंदवले गेले आहेत. मराठी भाषेत असे अनेक पराक्रमी प्रयोग करणाऱ्या या अवलियाने आता हा नवा आविष्कार रंगभूमीवर आणला आहे.
ही संकल्पना विशद करताना सुरुवातीला येणारी मृणाल कुलकर्णी यांची ध्वनिचित्रफीत मनोरंजक आहे. देशोदेशींचे भाषिक विश्वविक्रम आणि त्यात मायमराठीला मिळालेला मान, हे पाहून ऊर अभिमानाने भरून येतो आणि त्यानंतर हा भन्नाट प्रयोग सुरू होतो.
पहिल्यांदा हे ऐकताना हा सगळा प्रकार निव्वळ भाषेच्या कसरतीचा खेळ वाटण्याची शक्यता आहे. पण रंगमंचावर तो केवळ शब्दांचा खेळ राहत नाही. साधीशी कथा सांगताना ‘प’पासून सुरू होणारे असंख्य शब्द एकमेकांच्या हातात हात घालून पुढे सरकतात. मराठीतील जुने, दुर्मीळ आणि आज वापरातून जवळपास हद्दपार झालेले शब्द त्यात येतात; त्याचबरोबर इंग्रजीसह इतर भाषांतून मराठीत रूढ झालेले ‘प’कार शब्दही संहितेत सहज मिसळतात. ‘पजेरो’, ‘पब्लिक’, ‘पोस्ट’ यांसारखे शब्द आल्याने भाषेची गंमत आणखी खुलते. त्यामुळे हा प्रयोग केवळ मराठीच्या शुद्धतावादाचा आग्रह धरणारा नाही; उलट मराठीची इतर अनेक भाषांतील उपयुक्त शब्दांना पोटात सामावून घेण्याची ताकद दाखवणारा आहे.
मिलिंद शिंत्रे यांचे मराठी भाषेवरचे प्रेम आणि भाषेवरील प्रभुत्व या प्रयोगातून पदोपदी जाणवते. एखादा शब्द शोधून तो वाक्यात बसवणे ही एक गोष्ट; पण त्या शब्दांच्या आधारे अर्थपूर्ण, सलग आणि नाट्यमय कथानक उभे करणे हे त्याहून मोठे आव्हान आहे. ‘पुष्पाचे प्राक्तन’मध्ये हा आव्हानात्मक खेळ रंगमंचावर चालतो आणि प्रेक्षक त्या खेळात गुंतून जातो.
१७५० शब्दांची संहिता न अडखळता, न चुकता, न विसरता सादर करण्यासाठी प्रायोगिक रंगमंचावरील या कलाकारांनी सुमारे शंभर दिवसांची खडतर तालीम केली आहे. या कलाकृतीतील बाराही कलाकारांचे जबरदस्त सिंक्रोनायझेशन हा प्रयोगाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू ठरतो.
या प्रयोगाची खरी गंमत मात्र आवाजांच्या दुनियेत आहे. नेहमीच्या नाटकाला साथ देण्यासाठी वाद्यवृंद असतो; येथे वाद्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मानवी कंठ हाच वाद्यवृंद! संगीतासाठी केवळ आवाजांचा वापर केला जातो. एवढेच नव्हे, तर दैनंदिन जीवनात ऐकू येणारे विविध आवाजही मानवी कंठातूनच निर्माण केले जातात. त्यामुळे रंगमंचावर एकाच वेळी अभिनय, कथन, संगीत आणि ध्वनीनिर्मिती अशा अनेक कलांचा संगम अनुभवायला मिळतो. आपली नेहमीची परिचित गाणी, स्लोगन्स, जाहिराती, सिग्नेचर ट्यून हे सगळे आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचते.
अर्थात, अशा प्रयोगासमोर एक मोठे आव्हान असते—रसिकाने इतके सारे अपरिचित शब्द ऐकून आणि समजून घ्यायचे कसे? ‘पुष्पाचे प्राक्तन’ने त्यावरही कल्पक उपाय शोधला आहे. संहितेतील कठीण आणि दुर्बोध शब्दांचे अर्थ त्याच वेळी पडद्यावर प्रोजेक्शनच्या माध्यमातून दाखवले जातात. त्यामुळे ही भाषिक कसरत प्रेक्षकांसाठी कोडे न ठरता एक प्रकारचा खेळ होत जाते. न ऐकलेल्या शब्दांचे ओझे होत नाही, उलट विस्मृतीत गेलेला एखादा शब्द पुन्हा आपल्या शब्दभांडारात सामील झाल्याचा आनंद मिळतो.
इथे प्रयोगाचा केंद्रबिंदूच भाषा आहे. अक्षर हे नाटकाचे नेपथ्य आहे, शब्द हे त्याचे कलाकार आहेत आणि अनुप्रास हा त्याचा ताल आहे. या तालाला अभिनय, आवाज, संगीत आणि सामूहिक सादरीकरणाची जोड लाभल्याने त्याचे सौष्ठव अधिक खुलले आहे.
मराठी रंगभूमीला नवनवीन विषयांची, नव्या सादरीकरणाची आणि भाषिक धाडसाची गरज आहे. ‘पुष्पाचे प्राक्तन’ने यापैकी भाषिक धाडसाची बाजू समर्थपणे उचलली आहे. ‘प’ या एका अक्षरापासून सुरू झालेला हा प्रवास शेवटी मराठी भाषेच्या प्रचंड पसाऱ्यापर्यंत पोहोचतो. अक्षर एकच; पण त्यातून उलगडणारे विश्व मात्र अफाट! म्हणूनच ‘पुष्पाचे प्राक्तन’ हा केवळ एक प्रयोग नाही, तर मराठी शब्दसंपदेचा रंगमंचावर उमटलेला एक आगळा ‘प’राक्रम आहे.
‘प्रत्येकाने पुनःपुन्हा पाहावासा प्रशंसनीय प्रयोग.’
-
लेखक-दिग्दर्शक: मिलिंद शिंत्रे
-
संगीत: साई-पियूष
-
प्रकाशयोजना: योगेंद्र साने – तनिष शेंडे
-
निर्माता: अनिरुद्ध दिंडोरकर, अनंत पणशीकर
-
व्यवस्थापन: अनिकेत खरात
-
निर्मिती प्रमुख: प्रा. शुभंकर वाघोले
-
पार्श्वगायन आणि पार्श्वसंगीत कलाकार: आकाश भोपटकर, क्षितिज अभ्यंकर, वैष्णवी पै काकोडे, प्रज्ञेश नेरलेकर, भाग्यश्री गढवाल, रोहन पोळ, जय पेडणेकर
-
अभिनेते: रेणुका पोंक्षे, तेजस माहुलकर, केतकी भालवणकर, पुष्कराज भन्साळी, रिद्धी कुलकर्णी, अनिरुद्ध दिंडोरकर, बद्रीश कट्टी
-
छायाचित्र सौजन्य: संजय पेठे































































