स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ल्याचा इशारा, दिल्ली-एनसीआर ते कश्मीरपर्यंत हाय अलर्ट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देश 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत असतानाच सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. या इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून कश्मीरपासून दिल्लीपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार आयएसआय (ISI) आणि खलिस्तान समर्थक घटकांशी संबंधित पाकिस्तानस्थित एक नेटवर्क दिल्ली-एनसीआरमधील साथीदारांना आयईडी पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकते. यामुळे सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली-एनसीआरमध्ये सुरक्षा उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार फरहतुल्ला घोरी याचे नावही समोर आले आहे. घोरी हा पाकिस्तानात वास्तव्यास असून हिंदुस्थानातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मानला जातो. 2002 मध्ये गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा घोरीवर आरोप आहे. सुरक्षा यंत्रणा बऱ्याच काळापासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीत स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांसोबत लाल किल्ल्यावर निमलष्करी दल, एनएसजी हिट टीम्स आणि प्रशिक्षित स्नायपर्स तैनात केले जातील. याशिवाय एनडीआरएफची पथकेही सज्ज करण्यात येणार आहेत. लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात 5000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले जात आहेत.

लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर 2000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी ठेवली जात आहे. एफआरएस आणि एएनपीआर कॅमेऱ्यांचाही वापर केला जात आहे. सुरक्षा यंत्रणा दिल्ली, जम्मू आणि कश्मीर तसेच इतर संवेदनशील भागांमधील माहितीचा सतत आढावा घेत आहेत.