‘11 वर्षांत काहीही बदलले नाही’; NEET-NTAच्या मुद्द्यावरून जयराम रमेश यांचा केंद्रावर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेचे पावसाळी अधिवेशन पूर्णपणे वाया गेल्याचा आरोप करत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 11 वर्षांपूर्वी 2015 मध्ये व्यापम घोटाळ्यावरून पावसाळी अधिवेशन ठप्प झाले होते. आता 2026 मध्ये NEET आणि राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA)च्या त्रुटींच्या मुद्द्यावरून अधिवेशनाचे कामकाज ठप्प झाले आहे. 11 वर्षांत काहीही बदललेले नाही, अशी टीका रमेश यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना रमेश म्हणाले की, 2026 चे पावसाळी अधिवेशन पूर्णपणे वाया गेले. मात्र, असे पहिल्यांदाच झालेले नाही. 2015 मध्ये व्यापम घोटाळ्याच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर 11 वर्षांनी पुन्हा विद्यार्थ्यांशी आणि तरुणांशी संबंधित मुद्द्यावरून अधिवेशनाचे कामकाज ठप्प झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

‘11 वर्षांपूर्वी व्यापम, आता NEET’

रमेश यांनी व्यापम आणि सध्याच्या NEETच्या मुद्द्याची तुलना केली. 11 वर्षांपूर्वी व्यापम हा मुद्दा होता, तर यंदा NEET आणि NTAच्या कामकाजातील त्रुटी हा मुद्दा आहे. याच मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठप्प झाले आहे, असे ते म्हणाले.

2013 मध्ये NEETशी संबंधित अशाच प्रकारचा घोटाळा झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न आजही कायम असल्याचे रमेश यांनी म्हटले. गेल्या 11 वर्षांत कायदे करण्यात आले, आश्वासने देण्यात आली. आता सोशल मीडियावर रील्स तयार केल्या जात आहेत आणि पंतप्रधान मध्यरात्री देशाला संबोधित करत आहेत. मात्र, या काळात प्रत्यक्षात काय बदलले, असा सवाल जयराम रमेश यांनी उपस्थित केला. ‘11 वर्षांत काहीही बदललेले नाही. 11 वर्षांपूर्वी व्यापम आणि आता NEET तसेच NTAच्या त्रुटी हेच मुद्दे कायम आहेत,’ अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.