
नांदेडमध्ये शिरोमणी अकाली दलाचे (SAD) वरिष्ठ नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला झाला आहे. नांदेडच्या माता साहिब कौर परिसरातील एका गुरुद्वारात ही घटना घडली. हल्ल्यानंतर बादल यांना उपचारासाठी जवळच्या खासगी यशोसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारात एका निहंगने धारदार शस्त्राने बादल यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने बादल यांना रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून हल्ल्यामागील कारण शोधले जात आहे.
दरम्यान, घटनेनंतर सुखबीर सिंह बादल यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हल्लेखोराची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.






























































