एअर इंडियाच्या सर्व वैमानिकांची आता ‘डोप टेस्ट’अनिवार्य; फुकेत-दिल्ली विमानातील घटनेनंतर मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

फुकेत-दिल्ली विमान फेरीतील मुख्य वैमानिकाची मारिजुआना (गांजा) चाचणी पॉझिटिव्ह आल्याच्या, पार्श्वभूमीवर एअर इंडिया समूहाने गुरुवारपासून आपल्या सर्व वैमानिकांसाठी अंमली पदार्थांची अनिवार्य तपासणी सुरू केली आहे. विमान सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये आणि प्रवाशांचा विश्वास कायम राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एअर इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (फ्लाइट ऑपरेशन्स) कॅप्टन मनीष उप्पल यांनी गुरुवारी सर्व वैमानिकांना पत्र पाठवून या नव्या प्रक्रियेची माहिती दिली. एअर इंडियाने गेल्या अनेक दशकांत आपल्या वैमानिकांच्या व्यावसायिकता, कौशल्य आणि सुरक्षिततेप्रती असलेल्या बांधिलकीमुळे प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. हा विश्वास कायम ठेवणे ही कंपनीची सर्वात मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

फुकेत-दिल्ली विमान फेरीतील मुख्य वैमानिकाची कन्फर्मेटरी डोप टेस्ट मारिजुआनासाठी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर विमान वाहतूक सचिव समीर सिन्हा यांनी एअर इंडियाला सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, कंपनी आधीपासूनच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) सर्व नियामक नियमांचे पालन करते. हे नियम युरोप आणि अमेरिकेसारख्या प्रमुख विमान वाहतूक बाजारांमधील सुरक्षा मानकांशीही सुसंगत आहेत. मात्र, अलीकडील घटनेनंतर नियामक आवश्यकतांच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

नव्या प्रक्रियेमुळे एअर इंडिया समूहातील वैमानिकांमध्ये अंमली पदार्थांच्या वापराबाबत अधिक कठोर तपासणी केली जाणार आहे. विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत या उपाययोजना करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.