डेंग्यू, मलेरियाच्या साथीमध्ये पालिकेच्या धूरफवारणीच्या नावाखाली ‘धूळफेक’; तीन महिन्यांत डेंग्यू-१०६९, मलेरिया-३१७७ रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत डेंग्यू-मलेरियाची साथ पसरली असून गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूचे १०६९, तर मलेरियाचे तब्बल ३१७७ रुग्ण आढळले आहेत. पालिकेकडून डेंग्यू-मलेरिया निर्मूलनासाठी आवश्यक काम केले जात नसल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. डेंग्यू-मलेरियाची साथ असताना पालिकेकडून डासप्रतिबंधक धूरफवारणीच्या नावाखाली केवळ ‘धूळफेक’ सुरू आहे, असा संताप आज स्थायी समितीत शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी व्यक्त केला.

स्थायी समितीत ‘बी’ विभागाच्या कीटकनाशक विभागाचा अळीनाशक फवारणीकरिता सात महिन्यांसाठी स्वयंसेवक पुरवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी सभागृह नेते गणेश खणकर यांनी मुंबईत डेंग्यू-मलेरिया पसरला असताना प्रशासनाची यंत्रणा आजार नियंत्रणात कमी पडत असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या श्रद्धा जाधव, रमाकांत रहाटे, दीपमाला बढे, मीनाक्षी पाटणकर यांनीदेखील पालिकेकडून केल्या जाणाऱ्या फॉगिंगच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेड्युलनुसार धूरफवारणी होत नसून वॉर्डसाठी मशिन्स अपुऱ्या आहेत. अनेक वेळा धूम्रफवारणीवेळी डिझेल संपल्याने कामगार अर्धवट काम सोडतात. तसेच पावसाळी आजार पसरण्याचा धोका असताना याकडे दुर्लक्ष केले जाते, असे सांगत पालिकेच्या कामाचे वाभाडेच काढले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मुंबईकरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही, असे प्रशासनाला बजावत पुढील बैठकीत आतापर्यंत केलेल्या कामाचा संपूर्ण अहवाल सादर करा, असे निर्देश दिले.

धूम्रफवारणी पर्यावरणपूरक आहे का?

पालिकेकडून केली जाणारी धूम्रफवारणी पर्यावरणपूरक आहे का, असा सवाल तेजिंदर तिवाना यांनी प्रशासनाला केला, तर गाड्यांच्या माध्यमातून केली जाणारी परिणामकारक धूम्रफवारणी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याचे मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी निदर्शनास आणले. धूम्रफवारणी केवळ कागदावरच असल्याचे प्रीती सातम म्हणाल्या. यावेळी डॉ. सईदा खान, तुलीप मिरांडा, अजंता यादव, शिवकुमार झा, शीतल गंभीर आदींनी फॉगिंगवर नाराजी व्यक्त केली. यावर पालिकेने केलेल्या कामाच्या माहितीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवांगरे यांनी दिली.