
एमएमआरडीएमार्फत अभियंता पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भात अनेक गैरप्रकार व संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून या घोटाळय़ाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एमएमआरडीएतर्फे सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या पदांकरिता 11 आणि 12 मे रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसंदर्भात अनेक गैरप्रकार व संशयास्पद बाबी समोर आल्यामुळे ही भरती परीक्षा व निवड प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. परीक्षेचा निकाल पाहता उत्तीर्ण करण्याचा किंवा होण्याचा पॅटर्न असल्याचे दिसून येत आहे. तरी काही परीक्षा पेंद्रांवरील पॅटर्न संशयित असून, त्यांचीदेखील चौकशी होणे गरजेचे आहे, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
दोषींवर कारवाई करा, पुनर्परीक्षा घ्या
टीसीएसच्या पेंद्राचे सीसीटीव्ही फुटेज तपासून ते सुरक्षितपणे माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीकडे सुपूर्द करावे, डिजिटल सर्व्हर लॉग, लॉगिन-लॉग आऊट रेकॉर्ड, ऑक्टिव्हिटी रेकॉर्ड आणि परीक्षा प्रणालीतील डिजिटल रेकॉर्ड तपासावेत, चौकशीअंती निकालात गैरप्रकार आढळल्यास दोषी विद्यार्थी तसेच पेंद्रावरील कर्मचारी तसेच एमएमआरडीए अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी व परीक्षा सदोष आढळल्यास परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा एमपीएससीमार्फत घ्यावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.


























































