
शक्तिपीठ महामार्गाबाबत सत्ताधारी आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, म्हणजे दूध का दूध अन् पानी का पानी होईल. शक्तिपीठसाठी जमिनींच्या मोजणीचा घाट घातला आहे. शेतकऱ्यांनी एकसंघ राहून मोजणीसाठी अधिकारी आल्यास एकमेकांच्या मदतीने मोजणी रोखा. रात्री-अपरात्री चोरासारखे संयुक्तपणे जबरदस्तीने जमिनी मोजायला येणाऱ्या चोरांचा बंदोबस्त करा. त्याशिवाय शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांनी महायुती सरकारविरोधात एल्गार पुकारला.
येथील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून शक्तिपीठ महामार्गाविरोधात लढा तीव्र करताना शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार शिवाजीराव नाईक, उल्का महाजन, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यासह सांगली, कोल्हापूर जिह्यांतील शेतकरी, महिला शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, की या महामार्गाच्या माध्यमातून पैसै खाण्यासाठी घाई झाली आहे. पन्नास साठ हजार कोटी काढायचे आणि 2029 च्या निवडणुकीत खर्च करायचा हा हेतू ठेवून आपल्यावर वरवंटा फिरतोय. महामार्गाचे काम बेकायदा सुरू आहे. गावाच्या चावडीवर नोटिसा लावून मोजणी करण्यात येत आहे, पण संयुक्त मोजणी करू देऊ नका.
शक्तिपीठ देवाचे नव्हे, सत्ताधाऱ्यांचे पीठ
मोर्चावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार जयंत पाटील म्हणाले, शक्तिपीठ देवाचे नव्हे, सत्ताधाऱ्यांचे पीठ आहे. गावातील लोक पाणंद रस्ते मागत आहेत, ते दिले जात नाहीत; मग न मागता शक्तिपीठ महामार्ग का दिला जात आहे. शासनाकडे पैसे नाहीत, मग बाहेरून पैसे घेऊन हा रस्ता करण्याचा घाट कशासाठी घातला आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


























































