सामना अग्रलेख – पगारियाचे पेड इव्हेंट! कच्चा ‘वाटाणा’ उडतोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवून ‘पुरवठा कंत्राटदार’ कोट्यवधींचा मलिदा खातात व मुलांना मारतात. आंबेगावच्या शाळेतील मुलांना जो ‘वाटाणा’ दिला गेला तो कुकरच्या 13 शिट्ट्यांनंतरही शिजत नाही व तोच दगडासारखा टणक वाटाणा खाऊन मुलांना जगावे-मरावे लागते. हा शालेय पोषण आहार पुरवठादार भाजपचा, फडणवीस यांचा खास माणूस ‘पगारिया’ नागपूरचा आहे. याच पगारियाने नागपुरात फडणवीसांचा ‘जेन झी’ उत्सव साजरा करण्यास आर्थिक हातभार लावला (पेड इव्हेंट), असे म्हटले तर फडणवीस त्या कडक, न शिजलेल्या वाटाण्यासारखे टणाटणा उडतील, पण राज्यातील स्थिती ही अशीच आहे. अनेक भ्रष्ट पगारिया हेच भाजपचे बळ आहे. फडणवीसांनी आधी आत्मचिंतन करावे व मग सर्व पेड इव्हेंटचा तपास करावा. यापुढे त्यांच्या खोटेपणाचा वाटाणा शिजणार नाही हे नक्की!

राहुल गांधी यांनी मोदी-शहा व त्यांच्या नवभाजपच्या नाकी नऊ आणले आहेत. गांधी हे तरुणांच्या प्रश्नांवर स्वतः बोलतात व मुलांना बोलते करतात. गांधी यांच्या या ‘लाईव्ह’ उपक्रमास देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भाजपच्या ‘नौटंकी झीं’चे धाबे दणाणले व लगेच आपल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना त्यांनी फर्मान सोडले की, ‘‘आपण ज्या तरुणांची डोकी बारा वर्षे बिघडवून ठेवली, राहुल गांधींनी ते बधिर मेंदू दुरुस्त करायला सुरुवात केली. त्यातले लाखो तरुण आता ‘मोदी…मोदी’ऐवजी ‘राहुल.. राहुल.. राहुल’ गर्जना करीत आहेत. मंत्र्यांनो, हे असेच सुरू राहिले तर गडबड होईल. तुम्हीही कॉलेजांत, विद्यापीठांत जाऊन ‘जेन झीं’ना भेटा, मेळावे घ्या.’’ मोदी यांच्या हुकुमाने अनेक मंत्री कॉलेजात वगैरे जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण हा तरुण वर्ग काही त्यांना आता भीक घालत नाही. यापुढे तो ‘नमो’ नादात गुंग होऊन पकोडे वगैरे तळण्याचे स्टार्टअप करणार नाही. पदवीधर फुटपाथवर चहा विकणार नाही. तो दबला जाणार नाही. तो धार्मिक द्वेषाने पछाडून रस्त्यावर उन्माद करणार नाही. त्यामुळे मोदी-शहांच्या पक्षाची अवस्थाच खराब झाली आहे. पुण्यात गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ हा तरुणाईचा भव्य उत्सव केला. हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी राहुल गांधींशी संवाद साधण्यासाठी पुण्यात आल्या. हा कार्यक्रम होऊ नये म्हणून फडणवीस व त्यांच्या पोलीस यंत्रणेने जंग जंग पछाडले. आधी पुण्यातील कार्यक्रमाला परवानगीच नाकारली. काय हे भय! मग तणाव वाढला तेव्हा 30-35 अटी-शर्तींवर या कार्यक्रमास पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री ‘अभाविप’च्या

भाजपपुरस्कृत गुंडांनी

पुण्यात हैदोस करून दंगल घडविण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ले केले. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करून घेतले. पुणे पोलीस आयुक्त हे किती लाचार व सरपटणारे आहेत याचे हे उदाहरण आहे. पुण्यात भाजप नेत्यांचे कार्यक्रम होतात तेव्हा त्यांनाही या 30-35 अटी-शर्ती लागू होतात काय? याचे उत्तर पुणे पोलीस आयुक्तांनी द्यावे. देवेंद्र फडणवीस पुण्यातील युवकांच्या उद्रेकास घाबरले म्हणून पोलीस आयुक्त घाबरले, भाजपचे कार्यकर्ते घाबरले अशी डरपोकपणाची घसरगुंडी स्पष्ट दिसते. राहुल गांधी पुण्यातून ‘यशस्वी तरुणाई उत्सव’ म्हणजे ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम आटोपून जाताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात ‘जेन झी’ उत्सव रविवारी साजरा केला. मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचू लागतो तसाच हा प्रकार. कार्यक्रमाचे आयोजन संघ मुख्यालयासमोरच्या रेशीम बाग मैदानात केले व संघ स्वयंसेवकांच्या मुलांना या मैदानात ‘फुल पॅन्टी’ चढवून ‘जेन झी’ म्हणून बसवले. यावरही खर्च अमर्याद झाला, पण आपले मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘राहुल यांच्या तरुणाईचे कार्यक्रम म्हणजे पेड पब्लिसिटी इव्हेंट आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचा खर्च कोण करतो? याचा तपास करणार.’’ मुख्यमंत्री हे गृहमंत्री असल्याने ते ‘तपास’ वगैरे भाषेचा वापर करू शकतात, पण त्यांनी असे ‘तपास’ स्वतःच्या पेड इव्हेंटपासून करावेत. मोदी-शहा व एकंदरीत भाजपचे सर्व इव्हेंट हे काय ‘चिंचोके’ खर्च करून होतात काय? ‘जंतर मंतर’वरील तरुणांवर बेकायदेशीरपणे

‘पॅलेट गन्स’चा

वापर केला. तरुणांचे डोळे फुटले. हा आदेश कोणी दिला? हा प्रश्न संसदेत विचारला तेव्हा गृहमंत्री शहा पळून गेले ते गेलेच. त्यांचे चेले आता ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा खर्च कोणी केला याचा हिशेब मागत आहेत व तपास करीत आहेत. गांधी यांनी मोदी-शहा व संपूर्ण भाजपला वेड्यात काढले आहे आणि अर्धमेले करून सोडले आहे हे मात्र नक्की. तरुण वर्ग भाजपवर नाराज नाही, तर खवळला आहे. मोदी-शहा, फडणवीसांच्या त्याच त्याच भाषणात त्यांना रस नाही. तीच आश्वासने, तीच हिंदू-मुसलमान तणावाची भांग, स्टार्टअप, देशभक्ती (ढोंग) याला लोक कंटाळले आहेत. आत्मस्तुती व आत्ममग्नता या नशेत हे लोक आजही चूर आहेत. रस्ते, खड्डे, त्यातला घोटाळा यावर फडणवीस बोलत नाहीत. नाशिकच्या खड्ड्यांत पडून जे बारा बळी गेले त्यात सात जण ‘जेन झी’ आहेत. राज्यातील शालेय पोषण आहार खरेदी व पुरवठ्यात घोटाळा आहे. शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवून ‘पुरवठा कंत्राटदार’ कोट्यवधींचा मलिदा खातात व मुलांना मारतात. आंबेगावच्या शाळेतील मुलांना जो ‘वाटाणा’ दिला गेला तो कुकरच्या 13 शिट्ट्यांनंतरही शिजत नाही व तोच दगडासारखा टणक वाटाणा खाऊन मुलांना जगावे-मरावे लागते. हा शालेय पोषण आहार पुरवठादार भाजपचा, फडणवीस यांचा खास माणूस ‘पगारिया’ नागपूरचा आहे. याच पगारियाने नागपुरात फडणवीसांचा ‘जेन झी’ उत्सव साजरा करण्यास आर्थिक हातभार लावला (पेड इव्हेंट), असे म्हटले तर फडणवीस त्या कडक, न शिजलेल्या वाटाण्यासारखे टणाटणा उडतील, पण राज्यातील स्थिती ही अशीच आहे. अनेक भ्रष्ट पगारिया हेच भाजपचे बळ आहे. फडणवीसांनी आधी आत्मचिंतन करावे व मग सर्व पेड इव्हेंटचा तपास करावा. यापुढे त्यांच्या खोटेपणाचा वाटाणा शिजणार नाही हे नक्की!