
कश्मीरपासून ते थेट मेघालय, लडाख आणि बांगलादेशच्या सीमांपर्यंत… जिथे अंगावर काटा आणणाऱ्या थंडीत आणि प्रतिकूल परिस्थितीत आपले सैन्य अहोरात्र पहारा देत असते, तिथे पोहोचली आहे श्रीरामपूरच्या एका बहिणीच्या प्रेमाची आणि आधाराची साद. श्रीरामपूर येथील पूजा चव्हाण यांनी देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा देणाऱ्या सैनिकांसाठी यंदा तब्बल १३,००० राख्या स्वखर्चाने पाठवल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने चव्हाण जवानांना राख्या पाठवत आहेत.
पूजा यांच्या या आगळ्यावेगळ्या, सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रमाची सुरुवात एका अत्यंत हृदयद्रावक घटनेतून झाली. मालुंजे येथील भाऊसाहेब बडाक हे सैनिक शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबाशी व त्यांच्या दुकानाशी पूजा यांचा संपर्क आला होता. कर्तव्यावर जाण्यापूर्वी ते बहिणीसाठी अत्यंत प्रेमाने कपडे खरेदी करायला आले होते. त्यावेळी पूजा यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी दुर्गम भागातील खडतर परिस्थितीबद्दल माहिती दिली. दुर्दैवाने, त्यानंतर आठच दिवसांत ते शहीद झाल्याची बातमी आली. या घटनेने पूजा यांच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. ते सीमेवर देशासाठी प्राण पणाला लावतात, त्यांच्या घरच्यांना अजूनही अनेक मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो, ही जाणीव त्यांच्या मनात घर करून बसली आणि तिथूनच सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात झाली.
स्थानिक व्यावसायिकांना बळ
या उपक्रमाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व राख्या मोठ्या शहरांतून किंवा कारखान्यातून मागवलेल्या नाहीत. श्रीरामपूरच्या स्थानिक बाजारपेठेतील गरीब व लहान दुकानदारांकडून, तसेच महिला बचत गटांकडून या राख्या खरेदी केल्या जातात. येथील स्थानिक व्यावसायिकांना, छोट्या दुकानदारांना आणि महिलांना व्यवसाय व रोजगार मिळावा हा यामागील उद्देश आहे. राख्यांचे वजन, पोस्टल चार्जेस आणि वाहतुकीचा मोठा खर्च असूनही, त्या पूर्णपणे स्वखर्चाने या राख्या देशभरातील वेगवेगळ्या युनिट्सना पाठवतात.
या ठिकाणी जातात राख्या
पूजा या देशातील जम्मू, कश्मीर, लेह-लडाख, सियाचीन, अंबाला, सिलिगुडी, मेघालय, राजस्थान, पंजाब, गोरखपूर, जोधपूर, कारगील, आसाम या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या सैनिकांना गेल्या १२ वर्षांपासून नियमितपणे पूजा राख्या पाठवत आहेत.
पतीचा खंबीर पाठिंबा आणि कुटुंबाची साथ
एका महिलेसाठी १३,००० राख्या खरेदी करणे, त्यांची वर्गवारी करणे, योग्य पत्त्यावर पाठवणे हे काम सोपे नाही. परंतु, या संपूर्ण प्रवासात त्यांचे पती हर्षद चव्हाण आणि कुटुंबाचा १०० टक्के पाठिंबा लाभतो. कोणतेही संकट किंवा अडचणी न मानता, पती नेहमी या देशप्रेमाच्या कामात खांद्याला खांदा लावून खंबीरपणे पाठीशी उभे असतात, असे त्या अभिमानाने सांगतात. सुरुवातीला १,००० राख्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज १३,००० राख्यांपर्यंत पोहोचला आहे.





























































