
हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात कोलंबोत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हिंदुस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. भर मैदानात झालेल्या या राड्यामुळे यशस्वीवर चौफेर टीका होत आहे. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनीही यशस्वीच्या वर्तनावर टीका करत त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र यशस्वीने हर्षा भोगले यांच्या व्हिडीओखाली थेट कमेंट करत त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. क्रीडा वर्तुळामध्ये सध्या याचीच चर्चा रंगली आहे.
‘क्रिकबझ’वरील एका व्हिडीओमध्ये हर्षा भोगले यांनी यशस्वी आणि असिथाच्या वादावर भाष्य केले. यशस्वीने वाद न घालता निघून जाणे हा सर्वोत्तम पर्याय होता. तो गुणी फलंदाज आहे, मात्र त्याचा स्वभाव आक्रमक आहे. या आक्रमक स्वभावाचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर पडू नये आणि तो अडचणीत येऊ नये, असे आपल्याला वाटत असल्याचे हर्षा भोगले म्हणाले होते. या व्हिडीओच्या खाली आता यशस्वीने कमेंट करत उत्तर दिले आहे.
काय म्हणाला यशस्वी?
“समोरच्या व्यक्तीने मला काय म्हटले हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर कृपया तुमचे मत बनवू नका. जर कोणी मर्यादा ओलांडत असेल, तर त्याला त्याची जागा दाखवून देणे गरजेचे आहे. हा नवीन भारत आहे, तो लढणार आणि उत्तरही देणार!”, अशी कमेंट यशस्वीने हर्षा भोगले यांच्या व्हिडीओखाली केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?
पहिल्या दिवशी केएल राहुल बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी सर्व सूत्र हाती घेतली. यशस्वीने आक्रमक खेळी करत श्रीलंकेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सतराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फर्नांडो याने त्याला बाद केले. यशस्वीने 53 चेंडूत 45 धावा फटकावल्या. या खेळी दरम्यान त्याने 9 चौकार ठोकले. यशस्वीला बाद केल्यानंतर फर्नांडोने आक्रमक सेलिब्रेशन केले. हे पाहून पवेलियनकडे निघालेला यशस्वी माघारी फिरला आणि दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते. यावेळी यशस्वीने हेल्मेटने टक्करही दिली. यामुळे वातावरण चांगलेच तापले. अखेर श्रीलंकेच्या कर्णधाराने मधस्थी केली आणि यशस्वीला दूर घेऊन गेला. त्यानंतरही यशस्वीच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. याचा व्हिडीओही समोर आला आहे. तसेच मैदानात या वर्तनामुळे यशस्वीवर दंड किंवा बंदीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🥵 THINGS GET HEATED! 🥵
Yashasvi Jaiswal and Asitha Fernando exchange words as tensions rise in the middle. 👀
Watch #SLvIND, 2nd Test, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/7qJrORjx8V
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 23, 2026


























































