
सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून म्युनिसिपल कामगार संघाने आज महापालिका मुख्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संघटनेचे नेते, शिष्टमंडळ यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरलेले असतानाही आयुक्तांनी भेट न देता अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवल्याने सफाई कर्मचारी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला. तसेच 25 ऑगस्ट रोजी ‘काम बंद’ आंदोलनाची घोषणा केली आहे.
महापालिकेतील सफाई कामगारांचे, मोटार लोडरचे स्थलांतर तातडीने थांबवावे. लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार पात्र वारसांना नोकरी द्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेनुसार सफाई कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावीत आणि अनुपंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत आदी मागण्यांसाठी डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल कामगार संघातील सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, मात्र आयुक्तांनी प्रकाश आंबेडकर यांना भेट दिली नाही. त्यामुळे सफाई कर्मचारी चांगलेच खवळले. त्यांनी घोषणाबाजी करीत आयुक्तांचा निषेध व्यक्त केला. आयुक्त भेट देण्याचे का टाळत आहेत, असा सवाल करीत कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, उद्याच्या आंदोलनानंतरदेखील आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे नेते, शिष्टमंडळ यांना भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे.




























































