
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दुसरा हप्ता आज राज्य शासनाने जारी केला. 6 लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांना 5 हजार 86 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. दोन टप्प्यांत 12 लाख 58 हजार 243 शेतकऱयांना एपूण 10 हजार 115 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीचे वितरण करण्यात आले. शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर 7 ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यात 5 हजार 29 कोटी रुपये वितरीत करण्यात आले होते. त्यातून 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती. शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱयांना होणार आहे. कर्जमाफीमध्ये 32 लाखांहून अधिक शेतकऱयांचे कर्ज माफ केले जाणार असून 23 लाखांहून अधिक शेतकऱयांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारकडून यावेळी अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.




























































