स्मृतिगंध – व्याकरणतपस्विनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. जयदेवी पवार

मराठीच्या एखाद्या चुकीच्या शब्दानेही ज्यांना अस्वस्थ केले, शुद्धलेखनातील एखादी चूक ज्यांच्या नजरेतून अखेरपर्यंत सुटली नाही आणि व्याकरणातील नियमांमध्येही ज्यांनी कवितेचे सौंदर्य शोधले, त्या प्रा. यास्मिन शेख यांच्या जाण्याने एका पर्वाची सांगता झाली. जन्माने ज्यू, विवाहाने मुस्लिम कुटुंबाशी जोडलेल्या; पण मातृभाषेने आणि मनाने निखळ मराठी असलेल्या यास्मिनबाईंनी तब्बल 7 दशकांहून अधिक काळ मराठीच्या प्रमाणलेखनाची मशागत केली. व्याकरण शिकविले, लेखननियम घडविण्यात हातभार लावला, शब्दलेखनाचा कोश सिद्ध केला आणि पिढय़ान् पिढय़ांच्या विद्यार्थ्यांना भाषेचे भान दिले. वयाची शंभरी ओलांडल्यानंतरही हातातील लेखणी आणि शब्दांवरील नजर थकली नव्हती.

मराठी भाषा कशी लिहावी, तिचे व्याकरण कसे असावे आणि बदलत्या काळात तिच्या मूळ प्रकृतीचे भान कसे जपावे याविषयी आयुष्यभर आग्रह धरणाऱया ज्येष्ठ व्याकरणतज्ञ प्रा. यास्मिन शेख यांच्या जाण्याने भाषाशुद्धतेच्या प्रवासातील एका पर्वाचा अंत झाला आहे. अलीकडेच त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. शतकभराचे आयुष्य ही एखाद्या व्यक्तीची ओळख ठरू शकते; पण यास्मिन शेख यांच्याबाबतीत या शतकाचा अर्थ वेगळा होता. कारण या शंभर वर्षांतील 7 दशकांहून अधिक काळ म्हणजे तब्बल 70 वर्षे मराठीच्या शब्दांशी, त्यांच्या रचनेशी, शुद्धलेखनाशी आणि व्याकरणाशी निष्ठेने जोडलेला होता. व्याकरण हा रुक्ष नियमांचा पसारा नव्हे, तर नीट रचलेल्या कवितेसारखी नाजूक आणि सुंदर व्यवस्था आहे, असे मानणाऱया त्या शिक्षिका होत्या. मराठीच्या प्रमाणलेखनावर प्रेमाने, पण तितक्याच काटेकोरपणे लक्ष ठेवणारा एक सजग पहारेकरी त्यांच्या जाण्याने हरपला आहे.
रायगड जिह्यातील पेणमध्ये जन्मलेल्या यास्मिन यांचे मूळ नाव जेरुशा. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे कुटुंबाचे वास्तव्य वारंवार बदलत राहिले; पण जेरुशाची मराठीशी जुळलेली नाळ कायम राहिली. लहानपणापासूनच त्यांचे जग शब्दांनी भरलेले होते. शब्द, साहित्य आणि संगीत अशा वातावरणात वाढलेल्या जेरुशाला पुढे पंढरपूरच्या मराठी माध्यमाच्या शाळेत तळेकर नावाचे शिक्षक लाभले. त्यांनी शिकविलेले व्याकरण अवघड नियमांचे ओझे न वाटता भाषेतील रचना शोधण्याचा आनंद वाटू लागला. पुढील आयुष्याची दिशा तेथेच निश्चित झाली होती. पुण्याच्या स. प. महाविद्यालयात शिक्षण घेताना श्री.म. माटे आणि के. ना. वाटवे यांसारख्या विद्वान शिक्षकांचा सहवास त्यांना लाभला. त्यातून भाषाशास्त्र आणि व्याकरणाविषयीची ओढ अधिक दृढ झाली. पुढे अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह झाला आणि जेरुशा या यास्मिन शेख झाल्या. जन्माने ज्यू, विवाहाने मुस्लिम कुटुंबाशी जोडलेल्या आणि कर्माने मराठी भाषेला वाहून घेतलेल्या त्यांच्या आयुष्यानेच ‘भाषेला धर्म नसतो’ या त्यांच्या विचाराला एक विलक्षण प्रत्यय दिला. वयाच्या शंभरीतही त्यांनी भाषा ही धर्माच्या किंवा सीमांच्या चौकटीत बंदिस्त करता येत नाही, अशी भूमिका मांडली होती. मराठी शिकवताना विद्यार्थ्यांना व्याकरणाची भीती न घालता त्यामागील तर्क, लय आणि सौंदर्य समजावून देणे ही त्यांची खासियत होती. त्यांच्या कार्याचे महत्त्व मात्र वर्गखोलीच्या पलीकडे आहे. बालभारतीच्या पाठय़पुस्तक संपादनापासून नियतकालिकांमधील भाषाविषयक मार्गदर्शनापर्यंत त्यांचा संचार होता.
‘मराठी शब्दलेखन कोश’ हे त्यांचे महत्त्वाचे कार्य. 2007 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि नंतर सुधारित आवृत्ती निघालेल्या या कोशाने शुद्धलेखनाच्या अनेक प्रश्नांना प्रमाणभूत आधार दिला. यास्मिन शेख यांचा प्रमाणभाषेचा आग्रह काहींना जुन्या शुद्धतावादाचा वाटू शकतो. भाषा प्रवाही असावी; पण प्रवाहाला पात्रच नसेल तर तो पसरतो, ही जाणीव यास्मिन शेख यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती. म्हणूनच प्रमाणभाषा जपण्याची त्यांची भूमिका आज अधिकच समकालीन वाटते. भषाशास्त्राच्या विश्वातील अनेकांसाठी, त्या परंपरा आणि आधुनिकता यांना जोडणारा एक दुवा होत्या. त्यांच्या शिष्यांमध्ये पुढे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी झालेल्यांची संख्या मोठी होती. ‘त्यांची प्रगती हीच माझी खरी मिळकत’, असे त्या म्हणत.
भाषा ही केवळ संवादाचे साधन नसते. ती समाजाची स्मृती, संस्कृतीची खूण आणि विचार करण्याची पद्धत असते. म्हणून तिचे व्याकरण जपणे म्हणजे शब्दांवर पोलिसी पहारा ठेवणे नव्हे; त्या स्मृतीची सुसंगती राखणे होय. यास्मिन शेख यांनी आयुष्यभर नेमके हेच केले. प्रत्येक शब्द योग्य जागी, योग्य रूपात आणि योग्य अर्थाने यावा यासाठी आयुष्य वेचणाऱया यास्मिन देहरूपाने आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांचा कार्यरूपी वटवृक्ष मराठी भाषेला सदैव सावली देत राहील.