
किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद पार पडली. या परिषदेला हिंदुस्थान, रशिया, चीन आणि पाकिस्तानसह इतर देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. या परिषदे दरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा पार पडली. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाने केलेल्या एका कृत्यामुळे त्यांचे जगभरात हसे झाले. सोशल मीडियावर टीकेची झोड उठू लागल्यानंतर शरीफ यांना स्वत: सारवासारव करावी लागली.
नेमकं प्रकरण काय?
शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांचे एकत्रित फोटो काढण्यात आला होता. या फोटोसेशनचे फोटोही समोर आले. पाकिस्तानने सकाळी पावणे बारा वाजता सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले. मात्र फोटो शेअर करताना पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने खोडसाळपणा केला. या फोटोतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांना क्रॉप करण्यात आले.

नेटकऱ्यांनी केली धुलाई
पाकिस्तानच्या पीएमओ कार्यालयाने शेअर केलेल्या फोटोवरून वादळ उठले आणि नेटकऱ्यांनी पाकिस्तानची पार पिसे काढली. पाकिस्तानचे जगभरात हसे झाले. अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सारवासारव करावी लागली. दुपारी साडे तीनच्या सुमारास शाहबाज शरीफ यांनी सर्व नेत्यांचा समावेश असलेला मूळ फोटो आपल्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केला. मात्र म्हणतात ना “जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती!”
Today, I was honoured to address the SCO Council of Heads of State Meeting in Bishkek as Pakistan assumed the SCO Chairmanship for 2027. I congratulated the Kyrgyz Republic on successfully hosting the Summit and steering the Organization with distinction.
Guided by the Shanghai… pic.twitter.com/1mvRW85klD
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) September 1, 2026
मोदींचा दहशतवादावर हल्लाबोल
दरम्यान, या परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या देशांना थेट सुनावले. दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन मोदींनी केले. तसेच या गंभीर विषयावर कोणतेही दुहेरी मापदंड चालणार नाहीत. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, भरती, मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद्यांना मिळणारे सुरक्षित अड्डे या संपूर्ण परिसंस्थेला मुळापासून उखडून फेकून दिले पाहिजे. जे देश दहशतवादाचा वापर आपल्या धोरणाचे साधन म्हणून करतात आणि दहशतवाद्यांना आश्रय देतात, त्यांना संपूर्ण जगाने ठाम व स्पष्ट संदेश दिला पाहिजे. यासोबतच प्रादेशिक सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक संधी वाढवण्यावर भर देत, संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.



























































