अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत सुधार, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती आता सुधारत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, मूत्रपिंडाच्या संसर्गातून ते पूर्णपणे बरे झालेले नसल्याने त्यांना आणखी दोन दिवस रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. सध्या अण्णा हजारे यांच्यावर दक्षिण मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ताप, खोकला आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे अण्णा हजारे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्ताच्या तपासणीत मूत्रपिंडाला संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर राळेगणसिद्धी येथून सोमवारी रात्री त्यांना उपचारासाठी मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य आहार घेत असून त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या अण्णा हजारे यांची प्रकृती सुधारत असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

अण्णांची प्रकृती हळूहळू सुधारत असून ते अजून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. डॉक्टरांनी आणखी दोन दिवस रुग्णालयात ठेवून निरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. प्रकृती पूर्णपणे ठीक होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयात जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तत्पूर्वी, सल्लागार फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.