
नुकतेच पोटभर जेवून उठलात आणि थोड्याच वेळात पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा झाली असा अनुभव तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला अनेकांना वारंवार येत असेल. बहुतांश वेळा आपण याला सामान्य भूक समजून दुर्लक्ष करताय का? पण प्रत्येक वेळी असे होणे सामान्य नसून, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप, ताणतणाव आणि शरीरातील बदलांचे संकेत असू शकतात. तसेच जेवणात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण कमी असल्यास पोट लवकर रिकामे वाटते. पोळी, भात किंवा गोड पदार्थांमुळे पोट तात्पुरते भरत असले, तरी शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळत नाही. त्यामुळेच रोजच्या आहारात डाळी, पनीर, अंडी, दही, भाज्या आणि तृणधान्ये यांसारख्या पोषक घटकांचा समावेश कसा असावा, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
पुन्हा भूक लागण्याची प्रमुख कारणे:
पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे
अनेकदा शरीरातील पाण्याच्या कमतरतेला आपण भूक समजतो. जेवण झाल्यानंतरही पुन्हा काहीतरी खावेसे वाटल्यास आधी थोडे पाणी पिऊन काही वेळ वाट पाहावी.
अपुरी झोप
कमी झोपेचा थेट परिणाम भूक नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांवर होतो. पुरेशी झोप न मिळाल्यास भूक वाढवणारे हॉर्मोन्स सक्रिय होतात आणि गोड किंवा जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची इच्छा वाढते.
तणाव आणि इमोशनल इटिंग
तणाव, चिंता किंवा कंटाळवाणेपणामुळे अनेक लोक भूक नसतानाही खातात, ज्याला ‘इमोशनल इटिंग’ म्हणतात. अशा वेळी गोड, तळलेले किंवा आवडीचे पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते.
घाईघाईने जेवणे
तुम्ही खूप वेगाने जेवत असाल, तर गरजेपेक्षा जास्त खाऊनही पोट भरल्याची भावना लगेच निर्माण होत नाही. त्यामुळे अन्न हळूहळू आणि व्यवस्थित चावून खाणे योग्य ठरते.
पोटभर जेवल्यानंतरही सतत तीव्र भूक लागत असेल आणि त्यासोबत खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:
- वजन वेगाने कमी किंवा जास्त होणे
- खूप जास्त तहान लागणे
- वारंवार लघवीला होणे
- अशक्तपणा जाणवणे
- रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडणे , थायरॉइडच्या समस्या किंवा काही औषधांचे परिणाम यामुळेही भूक वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी भूक लागणे म्हणजे शरीराला अन्नाची गरज आहेच असे नाही.


























































