
हिंदुस्थान आपल्या सोन्याच्या गरजेपैकी बहुतांश सोने परदेशातून आयात करतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या आयातीवरील खर्च वेगाने वाढत आहे. वाढता खर्च लक्षात घेता सरकारने जनतेला कमी सोने खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. असे असूनही, सोन्याच्या आयातीचा खर्च कमी होत नसून त्यात वाढच होत आहे. सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यापासून त्यात आणखी भर पडली आहे. तसेच यूएईकडून हिंदुस्थान मोठ्या प्रमाणात सोने आयात करत आहे.
सर्वात मोठी सोन्याची आयात संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून होत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. UAE मधून इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात का होत आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हिंदुस्थानची सोन्याची आयात मागील वर्षीच्या ७.४९ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत, एप्रिल-जून २०२६ मध्ये ४७.१ टक्क्यांनी वाढून ११.०१ अब्ज डॉलर्स झाली. १३ मे रोजी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर ही वाढ झाली. याव्यतिरिक्त, सोन्याच्या वाढलेल्या आंतरराष्ट्रीय किमतींनीही आयातीच्या खर्चात वाढ होण्यास हातभार लावला आहे.
संयुक्त अरब अमिरातीकडून (UAE) हिंदुस्थानची सोन्याची आयात वाढली आहे. हिंदुस्थानने जून २०२६ मध्ये संयुक्त अरब अमिरातीकडून ६४९.४ दशलक्ष डॉलर्स किमतीचे सोने आयात केले. ते जून २०२५ मधील २३५.९ दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत १७५.२% जास्त आहे. तर देशांकडून होणारी आयात १७.७% ने घटून १.६० अब्ज डॉलर्सवरून १.३२ अब्ज डॉलर्सवर आली.
एप्रिल-जून तिमाहीत संयुक्त अरब अमिरातीकडून होणारी सोन्याची आयात दुप्पटीहून अधिक वाढली, जी मागील वर्षीच्या १.४० अब्ज डॉलर्सवरून १२४.८% वाढून ३.१४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. इतर देशांकडून होणारी आयात २९.३% ने वाढून ७.८७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली.
संयुक्त अरब अमिरातीकडून सोने आयात करण्यामागे हिंदुस्थान-संयुक्त अरब अमिराती मुक्त व्यापार करार (FTA) हे एक प्रमुख कारण आहे. या व्यापार करारानुसार, विशिष्ट किमतीच्या अटी पूर्ण करणारे सोने सामान्य १५% दराऐवजी १४% शुल्कावर हिंदुस्थानात येते. संयुक्त अरब अमिरातीकडून येणारे सोने स्वस्त असल्याने त्याची आयात वाढली आहे.




























































