सलमानचा पुतण्या अरहान खान अभिनय क्षेत्रात येण्यासाठी सज्ज; ॲक्शन चित्रपटातून घेणार एन्ट्री!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाॅलीवूडचा भाईजान म्हणून सलमान खानचे वलय सर्वांनाच ज्ञात आहे. सलमान, अरबाज आणि सोहेल नंतर आता ज्युनिअर खान देखील बाॅलीवूडमध्ये आता येणार आहे. सलमान खानचा पुतण्या अरहान खान अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अरहानच्या बॉलीवूडमधील पदार्पणाबाबत चर्चा सुरू होत्या, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अरहान एका हाय-ऑक्टेन ॲक्शन चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध अय्यर करणार असून त्यांनी यापूर्वी ‘ॲन ॲक्शन हिरो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर साकारला जाणार असून यात अरहान जबरदस्त ॲक्शन अवतारात दिसणार आहे. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. चित्रपटातील उर्वरित कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी अरहानने ‘दम बिर्याणी’ या पॉडकास्ट शोमध्ये काम केले होते. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध डिझायनर आणि चित्रपट निर्माते विक्रम फडणीस यांनी अरहानसोबतचा एक फोटो शेअर करत कॅमेऱ्यासमोरील त्याच्या या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोवर मलाईका अरोरानेही तिची प्रतिक्रिया नोंदवली होती. आता चाहत्यांना अरहानच्या या पहिल्या ॲक्शनपटाची कमालीची उत्सुकता लागली आहे.