Ratnagiri News – गोवंश हत्या करणाऱ्यांना रंगेहात पकडले, फणसवळे येथे मध्यरात्री थरारक घटना; पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवंशाची तस्करी करून त्यांची हत्या करत असतानाच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोघांना रंगेहात पकडले आहे. यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.दोन आरोपींनी पलायन केले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस आणि आरोपींमध्ये थरारक झटापट झाली. ही घटना बुधवारी रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे येथे घडली.

फणसवळे परिसरात मध्यरात्री गस्त घालत असताना जंगलमय परिसरात एक संशयास्पद इनोव्हा कार उभी असल्याची आढळून आली. पोलिसांनी त्या कारजवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपींनी गाडी पोलिसांच्या अंगावर घालून हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मुख्य रस्त्यावर पोलिसांची वाहन उभे असल्याने आरोपींनी मागे जाऊन जंगलमय भागातून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बेशुद्ध अवस्थेतील गोवंश पुढील चाकात अडकले त्यामुळे आरोपी वाहनातून उतरून जंगलाच्या दिशेने पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी धाडसाने आरोपींवर झडप घालून मोहसीन बाबू कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याचवेळी अन्य आरोपी जंगलात पळून गेले. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून जंगलात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. त्याचवेळी शहेनशहा अब्दुल सत्तार शेख याला ताब्यात घेतले.

उर्वरित दोघेजण पळून गेले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.पकडलेल्या दोन आरोपींची नावे मोहसीन बाबू कुरेशी वय ३० रा. मीरा रोड आणि शहेनशहा अब्दुल सत्तार शेख वय ४८ रा.माहिम अशी आहेत. पळून गेलेल्या दोघांची नावे अनुक्रमे अस्लम आणि देवा अशी आहेत. पकडलेल्या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.