उत्तर प्रदेशात गंगा-यमुनेच्या पाणी पातळीत वाढ, प्रेरणा स्थळ पुराच्या पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात गंगा आणि यमुनेच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नद्यांच्या वाढत्या पाण्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. घरांपर्यंत पुराचे पाणी पोहचले आहे. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यमुना नदीच्या काठावरील प्रेरणा स्थळ देखील पुराच्या पाण्याखाली गेले आहे. येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि अशोक सिंघल यांचे पुतळे आहेत. पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी या पुतळ्यांपर्यंत पोहोचले आहे.

महान पुरुषांच्या जीवन आणि विचारांनी लोकांना प्रेरणा देण्यासाठी प्रेरणा स्थळ बांधण्यात आले होते. तथापि, गंगा आणि यमुना नद्यांची पाण्याची पातळी वाढल्यामुळे, आता या स्थळालाही पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, बालुआघाट येथील ऐतिहासिक बारादरीलाही वाढत्या पाण्याच्या पातळीचा फटका बसला आहे. यमुनेचे पाणी बारादरीच्या घुमटांपर्यंत पोहोचले आहे. सतत वाढणाऱ्या पाणी पातळीचा परिणाम केवळ निवासी परिसरातच नाही, तर ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांवरही होत आहे, असे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.